
पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानशी हिंदुस्थान कुठल्याही परिस्थितीत क्रिकेट खेळणार नाही याची दक्षता घ्या. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमांवर तणावाचे वातावरण असून अशा स्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे राष्ट्रहितविरोधी आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी बीसीसीआयला पत्र लिहिले आहे.
हिंदुस्थान 14 सप्टेंबर रोजी आशिया चषकातील लढतीसाठी दुबई येथे पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणार आहे. याला देशभरातून तीव्र विरोध होत असून बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांना पत्र लिहिले आहे. क्रिकेट लोकांना आनंद देणारा खेळ आहे. परंतु सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे तणावाचे संबंध पाहता राष्ट्रीय हिताला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे, असेही गौरव गोगोई यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांच्या विधानाची आठवण
ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी हिंदुस्थानने खासदारांची शिष्टमंडळे विविध देशांमध्ये पाठवली होती. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान होता. त्यांचे हे कुटील कारस्थान जगाला सांगण्यासाठी ही शिष्टमंडळे नेमली होती. एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच हिंदुस्थानने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे विधान केले होते, याचीही पत्राद्वारे बीसीआयला आठवण करून दिली आहे.