परीक्षण; माणुसकीचा ठाव शोधणाऱ्या गझला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>साबीर सोलापुरी

गेल्या चार दशकांहून अधिक काळ गझलेचं चिंतन, गझलेची साधना, गझलेची सेवा करणारे अविनाश सांगोलेकर याचं तब्बल बेचाळीसनंतर ‘अविनाशपासष्टी’ हा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. गझलेच्या प्रांतात अविनाश सांगोलेकर यांची गझल समीक्षक, अभ्यासक म्हणून ठळक ओळख आहे. प्रारंभीच्या काळात प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या संपादनात मौलिक योगदान देणारे सांगोलेकर हे तंत्रशुद्ध गझल लिहिणारे गझलकारही आहेत. गझल संमेलन, मुशायरा, कार्यशाळा, चर्चासत्र गझलेसंबंधीच्या अनेक कार्यक्रमांतून मार्गदर्शनाबरोबरच ते गझल वेचत, वाचत आलेत.

त्यांनी गझलसंग्रह छापण्याची अजिबात घाईगडबड केलेली नाही. आजकालच्या शीघ्र गझलकारांच्या भाऊगर्दीत ही बाब महत्त्वाची आहे, स्वागतार्ह आहे. गझल लिहिणारा हा ताकदीचा कवी असावाच लागतो तसंच त्याला गझल आकृतिबंधाची, शुद्ध तंत्राची सांगोपांग माहितीही असावी लागते. कारण हा काव्यप्रकार वृत्तांनी, नियमांनी बांधलेला आहे. त्याचे कडक निर्बंध काटेकोरपणे पाळूनच गझल लिहावी लागते. गझलेत तांत्रिक कारागिरीबरोबरच अर्थभावही अत्यंत जरुरीचा असतो. या दोन्हीची यथायोग्य सांगड घालता आली की, शेर दाद घेतल्याशिवाय नाही राहत. अविनाश सांगोलेकर यांच्याकडं गझलेच्या सर्वांगीण तंत्राची माहिती अन् प्रतिभा या दोन्ही बाबी आहेत. याची प्रचीती त्यांचा प्रस्तुत गझलसंग्रह वाचताना येते.

अविनाश सांगोलेकर यांच्या बहुतांशी गझलांना आत्मभानाबरोबरच समाजचिंतनाची डूब आहे. पानंफुलं, चंद्रतारे या कविकल्पनेच्या गझला लिहिण्यापेक्षा समाजचिंतनाची वास्तववादी गझल लिहिणं ते अधिक पसंत करतात. आजूबाजूला जे घडतं, डोळ्यांना जे चित्र दिसतं, जे आतून अस्वस्थ करतं, तेच चित्रण त्यांच्या गझलांमधून येत राहतं. संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्य, बंधुता, समता या आत्यंतिक गरजेच्या मूल्यांवर त्यांचे अधिकाधिक शेर येतात. परिवर्तन अन् प्रबोधनाच्या वळणानं जाणाऱया त्यांच्या बऱयाचशा गझला आहेत. निव्वळ पानाफुलात रमामाण होणारा त्यांचा पिंड नाही. ‘फुल मजला एकही माहीत नाही’ असा ते स्पष्ट निर्वाळा देतात. माणूस अन् त्याचं जगणं महत्त्वाचं आहे, पण माणूसच माणसाला छळतो आहे, पिळतो आहे. गटातटानं माणसात फूट पडलीय. एकात्मता लोप पावत चाललीय. ‘सारा समाज हल्ली एकात्म आढळेना’ याची गझलकारास खंत वाटते. माणुसकीचा स्रोत काळजात झिरपावा. आजच्या घडीला माणसाला तोडणं नाही, तर जोडणं अगत्याचं आहे. ‘माणसाने माणसाला एकात्मभावाने जोडणारे गीत गावे’ असं त्यांचं कळकळीचं सांगणं आहे.
सांगोलेकर यांच्या अनेक शेरांमधून विद्रोहाचा स्वाभाविक सूर उमटतो. जे काही सांगायचं आहे ते थेटपणे, निर्भीडपणे सांगतात. त्यात मोहकतेपेक्षा दाहकताच अधिक असणार हे गृहीतच आहे. सभोवताली भयावह काळोख माजल्यानंतर केवळ वाती पेटवून चालणार नाही, तर हाती मशालीच घ्याव्या लागणार हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

ठेवून दूर वाती, घेऊ मशाल हाती
पूर्वी राज्यकर्त्यांवर चळवळींचा धाक होता. सामान्यांचे प्रश्न सरकारदरबारी मांडले जायचे, परंतु आजच्या संक्रमणाच्या काळात चळवळीतील मलईखाऊ नेत्यांनी चळवळीची वाट लावली. बुलंद नारे विरून गेलेत. चळवळीतला अस्सलपणा लोप पावला. लोकांना न्याय मिळवून देणाऱया चळवळींना मरगळ आली ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. ती चळवळीतल्या जुन्या-जाणत्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ऐकावी यासाठी सांगोलेकर प्रश्न उपस्थित करतात.
कुठे लोपली अस्सल चळवळ, ऐकू येते केवळ खळखळ
आसवं ढाळत बसण्याची ही वेळ नाही. वाढत चाललेल्या अनाचाराचा, अत्याचाराचा नायनाट करून रोगजर्जर झालेल्या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मरगळ झटकून नव्यानं चळवळ उभारण्याची खरी निकड आहे. नव्या चळवळीत प्रत्येकानं मसामील व्हावं असं आवाहनही सांगोलेकर करतात,
झटकून आता सारी मरगळ
चला उभारू नवीन चळवळ
म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांवर गझला लिहून त्यांच्या विषयीची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. तसंच सध्या होत चाललेल्या भीषण अधःपतनाची कैफियतही त्यांच्या समोर मांडलीय.
वंचितांना काळजी ना
नष्ट केला त्रास भीमा!
येत नाही का कुणाला वास बापू?
देश फिरूनी होत आहे दास बापू!
माणुसकीचा ठाव शोधणाऱ्या या गझलसंग्रहाचं रसिक स्वागत करतील असे वाटते.

[email protected]