मुंबई – गोवा महामार्गाचे काम टुकार आणि भिक्कार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावर विघ्नांची मालिका सुरूच असून चिपळूण येथे उभारण्यात येत असलेला सर्वात मोठा उड्डाणपूल पूर्ण होण्याआधीच आज कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गाच्या टुकार आणि भिक्कार कामाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. या दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता वाढली असून आम्ही मामाच्या गावी जायचे की देवाच्या घरी, असा संतप्त सवाल चाकरमानी करत आहेत.

चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत 1.81 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा पूल आहे. यात 46 पिलर उभारण्यात आले आहेत. त्यावर गर्डर चढवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातीलच एका गर्डरला आज सकाळी साडेसातच्या सुमारास तडा गेला आणि तो खचला. त्यावेळी मोठा आवाज झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर पुलाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, दुपारी पावणेतीनच्या सुमारास पूलच कोसळला. वाहनांची वर्दळ नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महामार्ग ठप्प

पूल कोसळल्याची माहिती मिळताच संबंधित अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. संध्याकाळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पुलाचा भाग मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला कोसळलेला असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली.

मिंधे सरकारचे दावे हवेत

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करणार, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात खड्डय़ांचे धक्के खातच चाकरमान्यांना गाव गाठावे लागले होते. हायकोर्टाने खरडपट्टी काढल्यानंतरही महामार्गाची रखडपट्टी सुरूच आहे. त्यात वेग वाढवण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे आजच्या घटनेने उघड झाले असून, हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

आमदार शेखर निकम जखमी

पुलाच्या गर्डरला तडे गेले आहेत. पूल धोकादायक बनला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार शेखर निकम पाहणी करण्यासाठी आले. ते पोहचले तेव्हाच पुलाचा उर्वरित भाग कोसळला. यात निकम यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यासह शहरप्रमुख मिलिंद कापडी हेसुद्धा जखमी झाले.

वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? – जयंत पाटील

आजच्या दुर्घटनेने बहुप्रतीक्षित अशा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी करतानाच कोकणवासीयांच्या डोळय़ात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा, अशी तोफ पाटील यांनी डागली.

शिवसैनिकांचा हिसका

गर्डरला तडा गेल्याचे समोर आल्याने सकाळपासूनच चिपळुणात तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. शिवसैनिकांनी धडक देत साईटवरील अभियंत्याला याचा जाब विचारला. यावेळी मोठा जमावही जमला. या जमावाने अभियंत्याला हिसका दाखवला.

मोठ्ठा आवाज आणि पळापळ

दुपारी पावणेतीन वाजता हा पूल कोसळला तेव्हा कानठळय़ा बसवणारा आवाज झाला. या आवाजाने सगळेच भयभीत झाले. साईटवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिवाच्या आकांताने धूम ठोकली. त्या परिसरात असलेल्या वाहनचालक आणि नागरिकांचीही पळापळ झाली. आजूबाजूच्या इमारतींतील लोक तसेच व्यापारीही घाबरून पळाले.

दुर्घटनेनंतर पुलाचे काम तत्काळ थांबवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे धाबे दणाणले असून मुंबईतून अभियंत्यांच्या टीमला पाचारण करण्यात आले.

बांधकामाच्या ठिकाणची व्रेनही तुटली आहे. कोसळलेला भाग उचलण्यासाठी बरेच दिवस लागू शकतात, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत 15 हजार कोटी खर्च करूनही हा रस्ता मार्गी लागलेला नाही. याआधी जुलै 2020 मध्ये कणकवलीतही उड्डाणपुलाचा भाग कोसळला होता.