
अथांग समुद्र, नरीमन पॉइंट येथील क्वीन्स नेकलेसची नजाकत, हेरिटेज वैभव आणि सनसेट पॉइंटसह, गगनचुंबी इमारतींची श्रीमंती गिरगाव चौपाटीवरील ‘व्ह्यूइंग गॅलरी’तून पाहण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. पालिकेच्या माध्यमातून गिरगाव चौपाटीजवळ समुद्रात सुमारे 40 मीटर अंतरापर्यंत ही गॅलरी बांधण्यात येणार आहे. या गॅलरीत एका वेळी 50 पर्यटकांना बसण्याची व्यवस्था असेल. या प्रकल्पाचे भूमिपूजन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध ‘स्वराज्यभूमी’ गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत ही ‘व्ह्यूईंग गॅलरी’ तयार करण्यात आली आहे. यासाठी पालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या भूमिपूजनप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, नगरसेविका जोत्स्ना मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त विजय बालमकार आदी उपस्थित होते.
अशी आहेत वैशिष्टय़े
z गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. त्या जलवाहिनीवर 475 चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
z समुद्राचे, चौपाटीचे तसेच ‘क्वीन्स नेकलेस’ अशी ओळख असणाऱया नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय व मनमोहक दर्शन या गॅलरीतून घडेल.
z भरती-ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून त्या अनुरूप ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणाऱया सर्व संबंधित परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या असून पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
































































