
राज्य शासनाच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत विरोधी पक्षाचे खासदार म्हणून विरोध करणे ठीक आहे. मात्र, एखादा विषय पटत नसेल तर अगोदर तुमच्या मालकीचे दारू आणि बियर निर्मितीचे कारखाने बंद करा आणि मगच तोंड उघडा, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नगर उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी खासदार सुजय विखे यांना दिले आहे. विखे यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावर जाधव यांनी विखे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका करणारे लोणी येथील आपल्या मालकीच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अवसायनीतून रॉकेट नावाच्या देशी दारूची विक्री करतात. त्याची चव चाखून ते खासदार संजय राऊत आणि दैनिक सामनावर टीका करीत असतील,तर त्याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची वाइन विक्रीबाबतची भूमिका याबाबत दैनिक सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्याबाबत सुजय विखे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याला गिरीश जाधव यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यासाठी त्यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या धोरणाबद्दल भाजप खासदार सुजय विखे नेहमीच टीका करीत असतात. पण सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत , चर्चेत यावे या माफक उद्देशाने विखे हे बेताल वक्तव्य करीत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना त्याची जागा दाखवून दिली तरीही त्यांना उपरती झालेली नाही, असा टोलाही जाधव यांनी लगावला. स्वतःच्या स्वार्थापोटी वेळोवेळी संधी साधू दलबदलू राजकारण करणे, ही त्यांची खासियत आहे. शिवसेना आणि अन्य व्यक्तीवर विखे पितापुत्र वारंवार टीका करून तोंडसुख घेत आहेत. मात्र, त्यांची वक्तवे बेताल आणि बिनबुडाची आहेत. ती नीतिमत्तेला धरून नाहीत. टीका करण्याआधी त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे आणि मगच बोलावे असा सल्लाही जाधव यांनी दिला आहे.
तुमच्या कारखान्यात तयार होणारी रॉकेट ही देशी दारू आपण चंद्रपूर येथे दारूबंदी असताना विकत होतात. तिथली दारूबंदी उठविण्यासाठी आपण किती प्रयत्न त्यावेळी केले होते. राज्यात मागील काळात दुष्काळ असताना आपल्या संभाजीनगर येथील बियर कंपन्यांना पाणी मिळावे व कंपन्या सुरु रहाव्यात यासाठी मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी आपण किती खटाटोप केला हे सर्वाना माहित आहे. कोरोना काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन कशा पद्धतीने आपण बेकायदेशीरपणे विळद घाटातील रुग्णालयाला उपलब्ध करून दिली. याची दाखल उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. आपल्या अशा मतलबी राजकारणाला आणि बेताल वक्तव्याची दखल नगरची जनता घेत नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर जनतेने निवडून दिले, या उपकाराची जाणीव न ठेवता आपण शिवसेनेवर टीका करणे, नीतीला धरून नाही, असेही जाधव यांनी विखे यांना सुनावले आहे.




























































