एक लिटर पाण्यात दिवस काढतात जिजामाता हायस्कूलच्या मुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सटाणा

सटाणा शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये एकूण 2700 हूनही अधिक मुली शिक्षण घेत आहेत. मात्र जेवण झाल्यावर हात कापडाला पुसून, घरून आणलेल्या लिटरभर पाण्यावर दिवस काढत वेळप्रसंगी पाण्याअभावी टायलेटलाही जाण्याचे टाळून भयानक परिस्थितीत दिवस काढत आहेत. शालेय प्रशासनाकडे या विषयावर काम करण्यासाठी ना संस्थेकडून एक रुपया मिळतो ना शालेय फंडातून खर्च करता येतो. अशी कुठलीही तरतूद शाळेकडे नाही. ही परिस्थिती आजच नाही तर वर्षानुवर्षे हा त्रास विद्यार्थी काढत आहेत.

आज एक बोअरवेल फक्त २०० लिटर पाणी देत आहे. आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या निधीतून दिलेला बोरवेल मुलींच्या पाण्याची तहान भागवू शकत नाही. सटाणा नगर परिषदेकडून दर वर्षी तगादा लावून जागेची व पाण्याची कर वसुली केली जाते मात्र त्यांनाही या गोष्टीचे सोयरसुतक नाही. आजमितीस पाण्याची टाकी कोरडी ठाक आहे आणि शौचालयातही टाकायला पाणी नसल्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. असे असतांना महिला शिक्षक व मुली यांच्या परिस्थितीचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे मुली जेवतानाही हात धूत नाही आणि जेवण झाल्यावरही हात धुण्यास पाणी नाही. पोषण आहार शिजवायला मुबलक पाणी नसल्यामुळे धान्य चांगले धुतले जात नाही आणि पर्यायाने खिचडी व्यतिरिक्त इतर डाळीही पाण्याअभावी शिजवता येत नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेळ प्रसंगी पदरमोड करून पाणी उपलब्ध करतात. तेही वारंवार करणे शक्य नाही. अशा भयानक परिस्थितीत शासनाने दिलेला पोषण आहार कसा द्यावा, हा मोठा प्रश्न शालेय प्रशासनास पडलेला आहे. जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये एकूण ७० ते ७५ कर्मचारी काम करत असतात. त्यात ६० टक्के महिला आहेत. त्यांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

शहरात अनेक व्यापारी व दाते आहेत. ते सतत दानधर्म करत असतात. अशा दात्यांनी आमच्या ज्ञान मंदिरातील शिकत असलेल्या बालिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. आठवड्यातून कमीत कमी दोन तरी टँकर उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन उपमुख्याध्यापक बी.ए. निकम यांनी केले आहे.

संस्थेकडे पाठपुरावा केल्याने भविष्यात आरम नदीच्या काठावर विहीर करून पिण्याचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे मात्र आम्ही शालेय इमारतीचा कर नगर परिषदेकडे १५ ते २० हजार रुपये भरत असून आम्हाला मात्र घरगुती वापरासारखा नळ काढून दिलेला आहे. तरी पालिकेने आम्हाला कायमस्वरूपी पाण्याचा नळ उपलब्ध करून द्यावा किंवा टँकरची व्यवस्था करावी. – एस.बी. मराठे, मुख्याध्यापिका जिजामाता गर्ल्स हायस्कूल.

पाण्याची अडचण पाहता आरम नदी काठावर जागा घेऊन विहिरीचे काम सुरू आहे आणि लवकरच जिजामाता गर्ल्स हायस्कूल, मराठा हायस्कूल, आदर्श अभिनव तसेच सटाणा महाविद्यालयाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न संस्थेकडून सोडवला जाणार आहे. तत्पूर्वी आम्ही लवकरच परिस्थितीचा आढावा घेऊन व्यवस्था करू. – राघो काशीराम अहिरे,
उपसभापती, मविप्र-नाशिक.

मुली आणलेल्या बाटलीतील पाण्यावरच दिवस काढतात. एखाद्या मुलीचे पाणी सांडले तर तिला पाणी मिळत नाही. शौचालयातही पाणी नाही. हात धुण्याचे पाणी नाही. मुलींना पाण्याची खूप गरज आहे.- मंजुषा किरण शेवाळे, विद्यार्थीनी, इयत्ता ११ वी.