पूरग्रस्तांना भरीव मदत द्या! जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे, दुकानांचे आणि कार्यालयांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांना मदतही देण्यात येईल. परंतु, प्रचंड मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून त्या तुलनेत भरपाई अल्प आहे. त्यामुळे पुरग्रस्तांना भरिव मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आज अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन अनिल देशमुख यांनी पूरस्थिती आणि पूरग्रस्तांना करण्यात येत असलेल्या मदतीचा आढावा घेतला. नागपूर शहरात पूर येण्याचे मुख्य कारण मलवाहिनी असून त्या ब्रिटीशकालीन आहेत. त्या नक्की कुठून वाहतात याचा शास्त्रशुद्ध नकाशा शोधण्यात अद्यापही नागपूर महापालिकेला यश आलेले नाही. नाग नदीच्या स्वच्छतेसाठी जपानच्या जायका कंपनीकडून 1 हजार 298 कोटी रुपये येणार होते. ते पैसेही आलेले नाहीत तसेच नाग नदीची स्वच्छताही झाली नसल्याचा उल्लेख अनिल देशमुख यांनी निवेदनात केला आहे. बंद असलेली रडार यंत्रणा तातडीने सुरु करण्याची मागणीही अनिल देशमुख यांनी केली.