मासुंदा तलावात काचेचा पूल, ठाणेकर करणार पाण्यावरून ‘वॉक’

अजित शिर्के । ठाणे

तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील मासुंदा तलाव भेटीगाठींचे डेस्टीनेशन म्हणून ओळखले जाते. सकाळ, संध्याकाळ हा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो. घोडागाडीची सैर आणि चटकदार खाद्यपदार्थांवर हात मारत मस्तपैकी अनेकजण येथे रपेट मारतात. सांस्कृतिक वैभवच ठरलेल्या या तलावात महापालिका भलामोठा काचेचा पूल उभारणार असून ठाणेकरांना आता पाण्यावरून वॉक करण्याचा आनंद घेता येईल. पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होणाऱ्या या प्रकल्पासाठी सहा कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे.

ठाणे शहरात आजघडीला 36 तलाव असून त्यामध्ये मासुंदा, उपवन, कचराळी, सिद्धेश्वर, रेवाळे, मखमली, खिडकाळी, कोलशेत, हरियाली या प्रमुख तलावांचा समावेश आहे. यामध्ये मासुंदा हे ठाणेकरांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण आहे. मध्यवर्ती असलेल्या मासुंदा तलावाच्या बाजूलाच गडकरी रंगायतन नाटय़गृह असल्याने येथे नेहमीच नाटय़रसिकांबरोबर बच्चेकंपनी तसेच तरुणाईचीही मोठी वर्दळ असते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आता या तलावाचा मेकओव्हर करण्यात येणार आहे. शिवाजी पथ रस्त्याला समांतर काचेचा पूल तलावात उभारण्यात येणार असून येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ठाणेकरांना पाण्यावरून चालण्याचेच अनोखे फिलिंग येणार आहे.

  • काचेच्या पुलाची लांबी 300 मीटर असून रुंदी साधारण 5 मीटरपर्यंत असणार आहे. यामध्ये टफनग्लासचा वापर करण्यात येणार आहे.
  • पुलासाठी पावसाळ्यानंतर पायलिंग खोदण्यास सुरुवात करण्यात येणार असून साधारण नऊ महिन्यांत काम पूर्ण होईल.
  • प्रकल्पासाठी सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून पुलाचा आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या