
सामना प्रतिनिधी । मुंबई
भविष्यातील प्रगतीचा, विकासाचा वेध घेणारे चर्चासत्र, संगीत, लोकनृत्य, नाटक, लोककला, आर्ट वॉक, खाद्यमहोत्सव अशी कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवाला आजपासून गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरुवात झाली. कोकणातील व्यापार आणि पर्यटन संधीचा प्रचार करण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानने या महोत्सवाचे आयोजन केले असून 6 जानेवारीपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.
ग्लोबल कोकण महोत्सवाचे उद्घाटन बंदर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात कोकणातील सर्वोत्कृष्ट ग्राम पुरस्कार सोहळा समारंभही झाला. यात सर्वोत्कृष्ट ग्रामविकास सरपंच म्हणून हडीचे महेश मांजरेकर, सर्वोत्कृष्ट आदर्श पर्यटन विकास सरपंच म्हणून दिवेआगरचे उदय बापट, कोकणातील पहीली वायनरी बनवणारी पालघरची प्रियांका सावे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान, सर्व पक्षांच्या कोअर कमिटीने या महोत्सवाचे आयोजन केले होते. या समितीत आमदार सुनील शिंदे, भास्कर जाधव, भाई जगताप, सुनील शिंदे, भास्कर जाधव, आशीष शेलार, कोकण भूमी प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक संजय यादवराव आणि किशोर धारिया उपस्थित होते.
सौरऊर्जेवर धावली रिक्षा
निबे मोटर्सच्या सौजन्याने दिवेआगरमध्ये इलेक्ट्रिक आणि सौरऊर्जेवर धावणाऱ्या रिक्षाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दिवेआगर हे ग्रीन व्हिलेज म्हणून घोषित केले असून कोकणातील आणखी काही गावेदेखील ग्रीन व्हिलेज अभियानात येतील.




























































