पालिकेने जागतिक निविदा मागवल्यामुळे कचरावेचक महिलांच्या पोटावर पाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन,मुंबई

गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने मोठय़ा सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केल्यामुळे ओल्या कचऱ्यावरून वादळ उठले होते. मात्र आता येत्या काही काळात सुका कचरा पेटण्याची शक्यता आहे. सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने जागतिक निविदा मागवल्यामुळे कचरावेचकांच्या पोटावर मात्र पाय येणार आहे.

डंपिंग ग्राऊंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपल्यामुळे रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांना खत प्रकल्पाची सक्ती केल्यानंतर आता पालिका प्रशासनाने सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सुका कचरा घराघरातून आणण्यासाठी सध्या तरी कोणतीही यंत्रणा नाही. वर्गीकरण केंद्रांवर आलेला कचरा वेगवेगळा करून त्यातला सुका कचरा भंगारवाल्याला विकला जातो. सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या या कामात कचरावेचक महिलांची पालिकेला मदतच होत असते. आता नवीन यंत्रणा प्रशासन आणणार असेल तर त्यात या महिलांना प्रशिक्षण देऊन सामावून घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे मत ज्योती म्हापसेकर यांनी मांडले.

महिला कचरावेचक डंपिंग ग्राऊंडवर आग लावत नाहीत

डंपिंग ग्राऊंडवरची गुन्हेगारी किंवा आगी लावण्याच्या घटना कमी व्हाव्यात म्हणून ही नवी यंत्रणा आणणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र डंपिंग ग्राऊंडवर आग लावण्याचे काम महिला कचरावेचक करीत नाहीत, असेही मत म्हापसेकर यांनी मांडले आहे. कचऱ्यातून धातूच्या वस्तू शोधण्यासाठी या आगी लावल्या जात असल्याचेही निरीक्षण त्यांनी मांडले.

  • मुंबईतील रोजचा कचरा – 7200 मेट्रिक टन
  • रोजचा सुका कचरा -800 ते 1000 मेट्रिक टन
  • कचरावेचक महिलांनाही यंत्रणेत सामावून घ्यावे

मुंबईत तब्बल 25 ते 30 हजार कचरावेचक महिला आहेत. तर केवळ 15 ते 20 टक्के पुरुष कचरावेचक आहेत. रस्त्यावर पडणारा कचरा ते गोळा करून भंगारवाल्यांना विकत असतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यामध्ये एकल महिलांचा जास्तीत जास्त समावेश आहे. पालिकेने नवीन यंत्रणा आणली तरी त्यात या महिलांना सामवून घ्यावे अशी आमची मागणी आहे- ज्योती म्हापसेकर, कचरावेचक महिला संघटना