
राज्यात कोरोनाचा सामुदायिक प्रसार वेगाने होऊ लागला आहे. आज कोरोनाचे तब्बल 70 रुग्ण आढळून आले. काल रात्री एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींचा आकडा तीनवर गेला आहे. फातोर्डा येथील त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आज 58 जण बरे होऊन घरी गेले असले तरी एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 198 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 717 सक्रिय आहेत. आता पर्यंत 478 जण बरे झाले आहेत.
मांगोर हिलमधून कोरोनाचा सामुदायिक प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांगोर हिलमध्ये सर्वाधिक 258 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत 235 रुग्ण असल्याने मांगोर हिल प्रकरण गंभीर बनले आहे. सडा, बायणा, कुडतरी, नवे वाडे, चिंबल, झुवारीनगर आणि मोर्ले येथे मोठ्या संख्येने रुग्ण मिळू लागले आहेत.





























































