कामगार खून प्रकरणी संशयीताला गजाआड करण्यात वास्को पोलिसांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

वास्को-खारीवाडो येथील  जेटीवर नांगरून ठेवलेल्या  ट्रॉलरवर  दोन कामगारांमध्ये काल मध्यरात्री दारूच्या नशेत झालेल्या  भांडणा नंतर आकूब लुगून याने मिथून उर्फ समीरच्या डोक्यावर दंडुक्याने  हल्ले करीत त्याचा खून केला. त्यानंतर आकूब घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र वास्को पोलिसांनी  सोमवारी पहाटे त्याला  गजाआड करून या खुनाचा छडा लावला.

वास्को पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. वास्को खारीवाडा येथील  जेटीवर नांगरून ठेवलेल्या रामा तारी यांच्या मासेमारी ट्रॉलरवर वरील दोन्ही कामगार कामाला होते. दारूच्या नशेत त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात आकूबने दांडा घेऊन  मिथुनच्या डोक्यावर जबर हल्ले करण्यास सुरुवात केली. यामुळे मिथुनच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. एक कामगार दुसर्‍यावर हल्ला करत असल्याचे जवळच नांगरून ठेवलेल्या अन्य एका मासेमारी

ट्रॉलरवरील एका कामगाराने पाहिल्यानंतर त्याने त्वरित  वास्को पोलिसांना माहिती दिली. दरम्यानच्या काळात अकूबने  तेथून पळ काढला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मिथूनला  उपचारासाठी इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मिथूनच्या खून प्रकरणातील  संशयित आकूब याचा शोध पोलिसांनी रात्रीच घेण्यास सुरुवात केली आणि सोमवारी पहाटे त्याच्या मुसक्या आवळल्या खून केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन काढलेल्या आकूब यास गजाआड  करण्यात यश मिळवले.

पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ, पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशियस व इतर पोलीस पथकाने यासाठी जोरदार मेहनत घेतली.

खून झालेल्या मिथूनची पूर्ण ओळख पटलेली नसल्याची माहीती निरीक्षक रापोझ यांनी दिली.  मिथून सुमारे ३० वर्षाचा होता असा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ट्रॉलर मालक रामा तारी यांनी आपल्या कामगारांचे पोलीस चाचणी अर्ज भरले नसल्याने त्यांच्या विरुद्धही भा.द.स १८८ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक रापोझ यांनी दिली.