
सामना प्रतिनिधी । नांदेड
शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या योग्य नियोजनाखाली गोदावरी महोत्सव घेण्यात आला त्यावेळी गोदावरी नदीच्या पात्राच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर या गोदावरीच्या परिसरात मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात शेंवाळ पसरले आहे. तसेच गोदावरी नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आल्याने या नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष वेधावे अन्यथा आम्हाला जलसमाधी घ्यावी लागेल, असा इशारा पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.
मनपाचे प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांना पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. या निवेदनात गोदावरी महोत्सवानंतर गोदावरी नदीचे पात्र पुन्हा जैसे थै झाले आहे. या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात शेंदाळ पसरले असून, गोदावरी नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रात शहरातील ड्रेनेजचे दुर्गंधी युक्त पाणी सोडल्या जात असून, गोदावरीच्या घाटावर देखील हे दुर्गंधीयुक्त पाणी जमले आहे. याबाबत वारंवार सूचना करुन सुध्दा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रामुख्याने अंत्यविधी व अस्थि विसर्जनाच्या वेळेस नागरिक येतात त्यावेळी गोदावरीची ही अवस्था बघून सर्वांनाच संताप येत आहे. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. येत्या आठवडाभरात ही साफसफाई मोहीम सुरु करण्यात यावी, परिसरातील घाण, दुर्गंधी आणि शेंदाळ काढून टाकण्यात यावे, अशी मागणी या सर्वांनी केली आहे.
































































