सुट्टय़ांमध्ये बाहेर जाताय…. कुंडीतील रोपांना मिळेल नियमित पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> सुहास मळेकर

आता सुट्टीचे दिवस आहेत. या आठ-दहा दिवसांत झाडांना पाणी कसे मिळेल हा प्रश्न पडतो. पण थोडीशी मेहनत घेतली आणि तशी व्यवस्था केली तर तुम्हाला निश्चिंतपणे घराबाहेर पडता येऊ शकते.

यासाठी एक प्रयोग करा. कॉटनच्या पट्टय़ांच्या नाडीचे बंडल बाजारात सहज उपलब्ध आहेत ते घेऊन या. एक दिवस आधी या नाडय़ा गरम पाण्यात धुऊन बुचकळून काढल्यावर त्यांची कांजी-स्टार्च निघून जाऊन त्या पाणी शोषून घ्यायला सक्षम होतात.

प्रत्येक कुंडीत सहा इंच कदाचित त्यापेक्षा जास्त खोलवर नाडी स्क्रूड्रायव्हरने खोचा. दुसरं टोक बादलीत आणून सोडा. कुंडी मोठी असेल तर तिच्यात दोन ते तीन नाडय़ा खोचाव्या लागतील. दहा ते बारा कुंडय़ांना एक बादली पाणी अशा चार बादल्या किंवा टब भरून पाणी ठेवा. नाडय़ा पाण्यात स्थिर रहाव्यात म्हणून त्या बादलीमध्ये पाण्यात एकत्र करून गाठी मारून ठेवा. पाण्यावर पक्षी येतील आणि नाडी अस्ताव्यस्त करतील म्हणून त्यावर थाळय़ा झाकण ठेवा.

पक्ष्यांना वेगळे स्वतंत्र पाणी ठेवा आणि मग झाडांचा प्रेमाने निरोप घ्या. रोज बादलीभर पाणी पिणारी झाडे आठ-दहा दिवस आवश्यक तितकंच पाणी शोषून घेतात. म्हणजे दहा कुंडय़ांना जिथे दिवसाला एक बादली पाणी लागतं तिथे त्याच कुंडय़ा आठ-दहा दिवसांत फक्त अर्धी बादली पाणी पितात.

खरंतर सर्व झाडे जगण्यापुरतं पाणी शोषून घेतात आणि छान तग धरून राहतात. फिरून आल्यावर प्रथम झाडांना पाणी घालून आपण आल्याची वर्दी दिली की दुसऱ्या दिवशी सकाळी झाडं पुन्हा तशीच डोलू लागतात तेव्हा आपणही आनंदी आणि टवटवीत होतो.