
सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत होती. मात्र, सोमवारी सोने-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. वायदे बाजारात सोन्याच्या दरात 0.4 टक्के वाढ होऊन सोन्याचे दर 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदीच्या दरात 0.6 टक्क्यांनी वाढ होत चांदीचे दर 68,350 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. जागतिक अस्थिर परिस्थिती, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, कोरोना संकट यामुळे सोन्याच्या दरात या वर्षात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याने 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
याआधीच्या सत्रात वायदे बाजारात सोन्याचे भाव 500 रुपयांनी तर चांदीचे भाव 1050 रुपयांनी घसरले होते. त्याआधीही बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच होती. गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या महिन्यात सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम हा उच्चांकी दर गाठल्यानंतर सोने-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत होते. जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर सोमवारी स्थिर होते. 1,941 डॉलर प्रति औंस असे सोन्याचे दर होते. तर चांदीच्या दरात 0.3 टक्क्यांची घसरण होत ते 26.68 डॉलर प्रति औंसवर आले होते.
कोरोना संकट, जागतिक अस्थिर परिस्थिती, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका या सर्व परिस्थितीमुळे या वर्षात सोने महागले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी बँकानी आणि सरकारने घेतलेले निर्णय यामुळे या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात श्राद्धपक्ष सुरु असल्याने सोन्याची मागणी घटली आहे. याकाळात सोन्याची खरेदी अशुभ मानण्यात येते. त्यामुळे देशात सध्या सोन्याची मागणी घटली आहे. सोने-चांदीच्या दरात आगामी काळातही चढ-उतार कायम राहतील आणि दिवाळीपर्यंत सोने 70 हजार रुपये प्रतिग्रॅमपर्यंत पोहचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
























































