
आयुष्यभर तमाम मराठी जनांची ‘हसवणूक’ करणारे, ज्यांच्या नावाशिवाय मराठी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही, असं बहुआयामी आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांची आज 101 वी जयंती. यानिमित्ताने गुगलने खास डुडल बनवून पुलंना ऊर्फ भाईंना अनोखी मानवंदना दिली आहे. समीर पुलावूर या कलाकाराने हे खास डुडल तयार केले आहे. त्यातून पुलंच्या जीवनकार्याची माहिती मिळत आहे.
साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक अशा विविध प्रांतातील पु.ल. देशपांडे यांचे योगदान कधी विसरता येणार नाही. त्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाची ‘अपूर्वाई’ आजही रसिक मनांना भुरळ घालते. गुगलने साकारलेल्या डुडलमध्ये पुलंच्या याच विविध कालागुणांची – रंगांची उधळण दिसत आहे. जणू काही इंद्रधनुष्यच! त्यामध्ये पुल हार्मेनियम वाजवताना दिसत आहेत. एक हात हार्मेनियमवर आणि एक उंचावून ते गात आहेत. त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व मनाला भावत आहे.
8 नोव्हेंबर या पुलंच्या जन्मदिनी पुलंच्या आठवणींना विविध माध्यमातून उजाळा देण्यात येत आहे. त्यातही गुगलचे डुडल अनोखे ठरले आहे.




























































