ठसा – आत्माराम पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गोरख तावरे

आत्माराम पाटील यांना लोक प्रेमाने बापू या नावाने हाक मारत. त्यांचा जन्म 1930 सालचा. धिप्पाड शरीरयष्टीचा हा साधासुधा माणूस मातीशी इमान राखणारा. त्यामुळे शेती आणि तालमीत त्यांचा जीव लागला. शेतीत जीवतोड मेहनत घेत असतानाच त्यांनी तालमीतही घाम गाळला. आयुष्य जगले, पण अतिशय साधेसुधे. जमीनजुमला, शेती, सत्ता असं सगळं काही असतानाही आत्माराम पाटील (बापू) यांनी साधेपणाने आयुष्य जगण्याला प्राधान्य दिले. आपली शेती, घर, संसार या पलीकडे त्यांनी कधीही पाहिले नाही. आपण आज करणाऱ्या या कष्टातच आपल्या कुटुंबाचा उद्धार होणार आहे, हे त्यांनी जाणले होते. घर, शेती, आपले कुटुंब, भावकी, आपल्यासोबतचा मित्रपरिवार हे आत्माराम पाटील तथा बापू यांचे विश्व होते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मोहमायेत ते अडकले नाहीत. आपल्या कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य देत काम करत राहिले. तरुण वयात केलेली तालमीतली मेहनत, अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत शेतीत राबणे, यामुळे त्यांची प्रकृती शेवटपर्यंत चांगली होती. 93 वर्षांचे आयुष्य जगताना निर्व्यसनी राहण्याचे व्रत बापूंनी जोपासले.

गोपाळ पाटील यांचा एकत्रित आणि मोठय़ा कुटुंबात जन्म झाला. एकूण आठ भावंडांपैकी आत्माराम पाटील हे सातवे. शिक्षण चौथीपर्यंतच घेतले. पण व्यवहारज्ञान चोख होते. उत्तम आहार, विहार आणि विचार यावर त्यांची जडणघडण झाली. तीच त्यांनी आपल्या मुलांमध्ये रुजवली. शेतीबरोबरच दुग्ध उत्पादनावर भर दिला. मनमिळावू स्वभाव आणि सतत माणसात राहण्याची सवय यामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. सतत लोकांमध्ये राहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची सवय असल्याने लोक भेटले नाहीत तर ते अस्वस्थ असायचे. घरासमोर खुर्ची टाकून येणाऱ्या-जाणाऱ्यांची ख्याली-खुशाली विचारताना ते दिसायचे. त्यांची ती छबी आता परिसरातील लोकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. पाटील भावकीतही त्यांच्याविषयी नितांत आदर होता व आजही आहे .

त्यांचा विवाह ओगलेवाडीच्या पाटील घराण्यातील अंजिराबाई यांच्याशी झाला. त्यांनी पतीला साथ देताना शेतीत लक्ष घातले. दोन मुले, दोन मुलींचा सांभाळ कष्टाने केला. त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी या मातापित्यांनी मदत केली. मुले जयवंतराव आणि बाळासाहेब ऊर्फ विजय यांच्यासह दोन मुली यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आग्रही होते. संपूर्ण कुटुंबावर त्यांचे प्रेम होते. वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे केले. पुढे मुलांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. शेतीसह उद्योग-व्यवसायात लक्ष घालून तो वाढवला. समाजासाठी आपल्यातील साधेपणा जपला. आत्माराम पाटील यांनी कुटुंबाला सुसंस्कार दिला. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक जीवनात मिळवलेले यश, व्यक्तिगत जीवनातील प्रगती ही आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने झाल्याची भावना त्यांच्या मुलांनी आजही जपली आहे. वडील हयात असणे हा मुलांना मोठा आधार असतो. मात्र आज बापू नावाचा पाटील कुटुंबीयांचा आधारवड हरपला आहे.