भात 2441, सोयाबीनला 5708 तर कापसाला 8267 रुपये हमीभाव; सरकारकडून 14 खरीप पिकांचा एमएसपी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आज 2026-27 या वर्षासाठी पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर केली. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत भाताचा एमएसपी 72 रुपयांनी वाढवून 2441 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. दरम्यान, उत्पादन खर्चाच्या किमान 50 टक्के अधिक हमीभाव निश्चित केल्याचा दावा सरकारने केला आहे.

कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव निश्चित केला जातो. अर्थविषयक कॅबिनेट कमिटी बैठकीत 14 खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सर्वात कमी केवळ 12 रुपये हमीभाव वाढ मूग पिकाला मिळाली आहे. गेल्यावर्षी मूग प्रति क्विंटल एमएसपी 8768 होता. यंदा 8780 रुपये केला आहे. सर्वाधिक एमएसपीमध्ये 622 रुपये वाढ सूर्यफूल पिकाला देण्यात आली आहे.

शेतकऱयांना हमी भाव मिळतो का?

दरवर्षी केंद्र सरकार खरीप पिकांचा हमीभाव जाहीर करते; पण शेतकऱयांच्या पिकांना ही किमान आधारभूत किंमत खरंच मिळते का? हा प्रश्न कायम आहे. जेव्हा पिक तयार होऊन शेतमाल बाजारात विक्रीसाठी येतो तेव्हा व्यापाऱयांकडून कमी भावाने खरेदी केली जाते. शेतकऱयांना हमीभाव मिळावा यासाठी सरकार काय करते? असा सवाल उपस्थित होत आहे.