
केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दुसऱया डोसबाबत नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. त्यानुसार सिरमच्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱया डोससाठी 4 ते 8 आठवडय़ांचे अंतर ठेवले जावे, असे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत कोविशिल्डचा दुसरा डोस चार-सहा आठवडय़ांनी दिला जात होता. त्यात आता बदल केला असून त्याबाबतच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना दिल्या आहेत. दरम्यान, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीबाबत हा नियम लागू नसून ती चार आठवडय़ांनीच दिली जाणार आहे.
कोविशिल्डच्या सध्याच्या व्हॅक्सीन फॉर्म्युल्यानुसार पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तर 42व्या दिवशी संबंधिताच्या शरीरातील ऍण्टीबॉडीची चाचणी केली जाते. त्यामुळे लसीने शरीरात आपले काम सुरू केले आहे की नाही हे समजते. पण आता हा फॉम्युला बदलला असून पहिल्या आणि दुसऱया डोसमधील अंतर चार-आठ आठवडे असणार आहे. म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर 42 दिवसांनी दुसरा डोस तर 56 दिवसांनी शरीरातील ऍण्टीबॉडीची चाचणी केली जाणार आहे. कोव्हीशिल्डच्या लसीच्या पहिल्या आणि दुसऱया डोसमधील अंतर 6-8 आठवडय़ांचे ठेवल्यानंतर अधिक चांगले परिणाम दिसून येत असल्याचे नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सीन ऍडमिट्रेशन फॉर कोव्हीड-19ने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
दोन डेसमधील अंतर जास्त ठेवल्यास अधिक चांगले रिझल्ट
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये जेवढे जास्त अंतर ठेवले जाईल तेवढा अधिक चांगला रिझल्ट मिळत असल्याचे जसलोक रुग्णालयाच्या इन्फेक्शियस डिसीजच्या कन्सलटंट डॉ. माला व्ही. कोनेरिया यांनी म्हटले आहे. दोन डोसमध्ये सहा आठवडय़ांपर्यंत अंतर ठेवल्यास 55 टक्क्यांपर्यंत रिझल्ट मिळतो. तर 12 आठवडय़ांपर्यंत अंतर ठेवल्यास 82 टक्क्यांपर्यंत रिझल्ट मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.



























































