कॅन्सरविरोधातील लढय़ात आयुर्वेद-अलोपॅथीने एकत्र यावे -राज्यपाल

भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टने संशोधन करून पेटंट केलेले ‘केमो रिकव्हरी किट’ हे कॅन्सर रुग्णांवरील जलद उपचारांसाठी वरदान ठरणार आहे. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या रोगाविरोधात आता आयुर्वेद आणि अॅलोपॅथी यांनी एकत्र येऊन उपचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात झालेल्या किट लोकार्पण कार्यक्रमात बोलताना केले.

राज्यपाल म्हणाले, ‘शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमध्ये सातत्याने संशोधन करत राहण्याची गरज आहे. आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितिसाठी फक्त मार्पेटिंगच्या मागे न लागता संशोधनावर अधिक भर देण्याची सध्या आवश्यकता आहे.’ ‘कॅन्सरवरील उपचारासाठी उपयोगी पडणाऱया या संशोधनाला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून द्यायला हे पेटंट उपयोगी पडणार आहे. यावेळी पद्मभूषण अशोक पुकडे, पद्मभूषण देवेंद्र त्रिगुणा, प्रमुख संशोधक वैद्य सदानंद सरदेशमुख आदी मान्यवर सहभागी झाले होते.

आतापर्यंत 14 हजार जणांवर यशस्वी चाचणी 

कॅन्सरवरील किटद्वारे एकूण 7 पेटंट दाखल करण्यात आली असून त्यातील 4 प्रत्यक्ष प्रकाशनाच्या टप्प्यात आली आहेत. या किटमध्ये प्रामुख्याने सुवर्णभस्म, प्रवाळयुक्त अशा विविध संशोधित व टाटा रीसर्च सेंटरद्वारा प्रमाणित औषधांचा वापर करण्यात आला असून जवळपास 14,000 रुग्णांवर आतापर्यंत याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या