इंधनाच्या वाढत्या दरांवर आणि वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी एसटीच्या पाच हजार बसेस आता एलएनजीवर (द्रवरूप नैसर्गिक वायू) धावणार आहेत. डिझेल बसेसचे एलएनजी बसमध्ये रूपांतर करण्यासाठी व एसटीच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारने महामंडळाला 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एलएनजीमुळे महामंडळाची दरवर्षी इंधनाच्या खर्चात 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के निधी डिझेलवर खर्च होतो. महामंडळाच्या ताफ्यात सध्या 16 हजार 700 बसेस आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने ताफ्यातील डिझेलवर धावणाऱया पाच हजार डिझेल बसेसचे एलएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किंग गॅस पंपनीसोबत करारही करण्यात आला होता.
महामंडळाच्या 500 बसेस सध्या या सीएनजीवर धावत आहेत. आता आणखी पाच हजार गाडय़ा एलएनजीमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याने त्यासाठी एकूण 970 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने डिझेल वाहनांचे एलएनजीमध्ये होतील. त्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने 40 कोटी रुपयांचा निधी महामंडळाला दिला आहे. बसगाडय़ा एलएनजीमध्ये रूपांतरित करणाऱया पंपनीला त्याची देखभाल करावी लागणार असून त्यांच्या देखभालीचा खर्च महामंडळाकडून देण्यात येणार आहे.