‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील – सुनील पावडे

145

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील त्याकरिता ग्रामस्थांनी वीजे संदर्भातील आपल्या समस्या घेऊन याव्यात, असे आवाहन विद्युत वितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक सुनिल पावडे यांनी केले. ते आज शिरूर तालुक्यातील वडनेर येथे उपस्थित शेतकरी, वीज ग्राहक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडण्यासाठी सुनिल पावडे यांच्या संकल्पनेमधून बारामती विभागामधील तालुक्यात एक गाव एक दिवस ही योजना राबविण्यात येत असून यामधे वीज कंपनीच्या विविध योजनाची माहीती देणे, ग्राहकांना नवीन कनेक्शन देणे बिल दुरुस्ती, रोहित्र दुरुस्ती या सारख्या अनेक समस्यांचा निपटारा गावातच करण्यात येणार आहे. या उपक्रमाची आज वडनेर खुर्द व जांबुत येथून सुरवात करण्यात आली.

यावेळी अधिक्षक अभियंता चंद्रकांत पाटील, कार्यकारी अंभियंता राजेंद्र येडके, उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड, सहाय्यक अभियंता भगवान विधाटे, शाखा अभियता दिपक पांचुदकर, जांबूतच्या सरपंच डॉ. जयश्री जगताप, बाबाजी निचित, रतन निचित, रखमा निचित, सुभाष निचित, आबा पवार तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज मंडळाच्या बाबतीत ग्राहकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी असून जुनी झालेली कामे पुन्हा दुरुस्त करण्यांची गरज आहे. या योजनेमधूनही कामे होणार असल्याने अपघात टाळून ग्राहकांना खात्रीशिर विज मिळणार आहे.

या वेळी सुनिल पावडे यांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा लाभ घेण्यांचे आवाहन केले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केले. या भागात बिबट्यांचा वावर असल्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी उच्च दाबविद्युत प्रणाली अंतर्गत मंजुर झालेल्या रोहीत्रांचे उद्घाटनही करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या