गाईडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 प्रशांत येरम

सध्या बालभारतीने गाईडस्चे परवाने देऊन विद्यार्थ्याच्या गाईड वापरण्याला जणू अधिकृत मान्यता दिली आहे. गाईड्सचा वापर कितपत करावा…?

जून महिना सुरू झाला की मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही शाळेचे म्हणजे त्यांच्या अभ्यासाचे वेध लागतात आणि मग मुलांना अभ्यास सोपा जावा यासाठी त्या वर्षाच्या पुस्तकांची ‘खरेदी’ १५ दिवस आधीच सुरू होते. इंगजी, गणित, सायन्स या विषयांना प्राधान्य दिले जाते आणि पुस्तकांसोबत त्या त्या विषयांची गाईड्सही ‘खरेदी’ केली जातात.

पण खरंच, या मुलांना गाईडची आवश्यकता असते का? की पालकच आपल्या पाल्याच्या माथी ही गाईड्स मारत असतात? गाईडमुळे प्रश्नांची उत्तरे आपसूकच मिळणे हे जरी सोपे होत असले तरी त्या विषयाचा अभ्यास तो विद्यार्थी समजून करण्यास असमर्थच ठरत असतो. शाळेत साधारणपणे पाचवी, सहावी, सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम हा अतिशय सोप्या पद्धतीने शासनाने आखून दिलेला आहे. तो करताना विद्यार्थ्याला विषय समजून घेऊन त्याला तो समजणे सोपे जावे याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक धडय़ातील ठळक मुद्दय़ांवर भर देत प्रश्न तयार करण्यात येतात. शिवाय त्याच धडय़ावरील काही मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांना त्यावरील प्रश्न दिले जातात. ज्यायोगे विषय सोपा होऊन त्याचे आकलनही विद्यार्थ्याला  सहज होते.

हल्ली मराठी माध्यमाच्या शाळांमधून ‘सेमी इंग्लिश’ सुरू करण्यात आले आहे. यात गणित आणि सायन्स हे विषय इंग्रजीमधून शिकवले जातात, पण हे विषय शिकवले जात असताना त्या विद्यार्थ्यांना ते विषय समजणे तितकेसे सोपे जात नाही. कारण त्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पायाच मजबूत नसल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे आणि मग त्यासाठी ‘चुकीच्या पद्धतीने’ गाईडचा वापर विद्यार्थी करतात. किंबहुना पालकच विद्यार्थ्यांना सांगतात की, विषय समजला नाही वा उत्तरे सापडत नसतील तर गाईडचा वापर कर. पण ते अतिशय चुकीचे असल्याचे मत एकवीरा शाळेमधील हिंदी विषयाचे शिक्षक असलेले दुबे सर यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, पाचवी ते सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम सेमी असो वा नसो, मुलांकडून तो सोप्या पद्धतीने कसा करवून घ्यायचा याच्या गाईडलाइन्स शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे सातवीपर्यंत गाइडची तशी आवश्यकताच भासत नाही. विद्यार्थ्यांनी फक्त त्यांना शिकविण्यात आलेल्याच पद्धतीने अभ्यास केला तर कोणताही विषय त्यांना कठीण जाणार नाही. पुस्तकाच्या माध्यमातून ज्याप्रकारे अभ्यास होतो ‘सेल्फ स्टडी’, तसा अभ्यास गाईड वापरून होणे कठीणच आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शिकविलेल्या धडय़ांवर परिच्छेद देण्यात येऊन त्यातूनच प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत, तर काही वेळेस डायग्राम देऊन कॅरेक्टर शोधून उत्तरे लिहायची आहेत. त्यामुळे गाईडचा कोणत्याच प्रकारे उपयोग होणार नाही. पुस्तकातील धडे, प्रकरणे वाचल्यानंतर त्याचे आकलन होण्यास जास्त प्रमाणावर मदत होते.

गाईडचा वापर हा पालक आपल्या मुलाने तो विषय लवकर सोडवावा यासाठीच करत असतात. पण तोच विषय जर त्यांनी मुलांकडून धडा वाचून वा प्रकरण सोडवून घेतला तर ते मुलांसाठी फायद्याचेच ठरणार आहे. पण पालकच मुलांना तयार उत्तरे मिळवून देण्यासाठी गाईडचा आधार देत मुलांना त्या विषयात ‘पंगू’ बनवत आहेत. गाईड वापरायचेच असल्यास केवळ एक ‘गाईडलाइन’ म्हणून वापरले व मुलांना वाचनाकडे जास्त प्रमाणावर वळवले तर गाईडचा उपयोग ‘शून्यात’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मुलांनीही आपली वाचनाची आवड वाढवणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘वाचाल तरच वाचाल.’