फेसबुकवर इस्लामविरोधी पोस्ट टाकल्याने तरुणाची निर्घृण हत्या, दोन मौलवीसह 6 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी दोन मौलवींसह सहा जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर इस्लामविरोधी पोस्ट टाकल्याने एका 27 वर्षीय तरुणाच्या हत्या केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. मौलाना कमर गनी उस्मानी आणि मौलाना मोहम्मद अयूब जावरवाला असे अटक केलेल्या दोन मौलवींची नावे आहेत. मौलवी कमर गनी उस्मानी याने आपल्या भक्तांना गुजरातमधील धुंधुका येथील तरुण किशन भरवाड यांची हत्या करण्यासाठी उद्युक्त केले आणि हत्येसाठी पिस्तूलही पुरवले. तसेच मौलाना जावरवाला यानेही पिस्तूल आणि जिवंत काडतुसे उपलब्ध करून दिली. मौलाना कमर गनी उस्मानी दिल्लीतील दरियागंज, तर मौलाना जावरवाला जमालपूर येथील रहिवासी आहे.

गुजरात पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन स्क्वॉडने राजकोट येथून दोन भावांनाही या प्रकरणी अटक केली आहे. या दोघांनी मौलानाला एक पिस्तूल आणि पाच गोळ्या दिल्या होत्या. तसेच याच मौलानावर त्रिपुरामध्येही धार्मिक हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एटीएसच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, अटक केलेला मौलाना तहरीक-ए-फरोग-ए-इस्लामी नावाची एक संस्था चालवतो. या संस्थेच्या एका कार्यालयातून बाहेर पडताना त्याला अटक करण्यात आली. एप्रिल 2021 मध्ये त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याने इस्लामचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्याची भाषा वापरली होती. तसेच इस्लामविरोधात बोलणाऱ्यांसोबत ‘काहीही’ करण्याची परवानगी मुसलमानांना असल्याचे चिथावणीखोर भाषण त्याने दिले होते.

मौलानाच्या चिथावणीनंतर हत्या

मौलानाच्या सांगण्यावरूनच शब्बीर चोप्रा नावाच्या एका तरुणाने 25 जानेवारी रोजी किशन भरवाड याची हत्या केली. शब्बीर याने किशनला गोळ्या घातल्या होत्या, तर इम्तियाज पठाण नावाचा व्यक्ती दुचाकी चालवत होता. मौलाना या दोघांच्याही संपर्कात होता. या दोघांनी आजिम बशीर शामा आणि वसीम बशीर शामा या दोन भावांकडून पिस्तूल आणि गोळ्यांची खरेदी केली होती. या सर्वांना आता अटक करण्यात आली आहे.

गोहत्या, लव्ह जिहादविरोधात सक्रिय होता

किशनच्या कुटुंबियांनी याबाबत बोलताना म्हटले की, तो लव्ह जिहाद, गोहत्याविरोधात सक्रिय होता आणि त्याविरोधात आवाज उठवत होता. बजरंग दलासोबत तो काम करत होता. तीन आठवड्यांपूर्वी त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती आणि इस्लामविरोधात असल्याची सांगत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर धर्मांधांनी त्याची हत्या केली.