गुरमीत राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर, सहा वर्षात 16 वेळा आला तुरुंगाबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. हरयाणा सरकारने त्याला हा पॅरोल मंजूर केला आहे. २०१७ मध्ये बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यापासून राम रहीम तुरुंगाबाहेर येण्याची ही 16 वी वेळ आहे. दोन महिला शिष्यांवर (साध्वी) लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तो सध्या २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

या चालू वर्षात राम रहीमला दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला आहे. यापूर्वी याच वर्षाच्या सुरुवातीला, ५ जानेवारी २०२६ रोजी शाह सतनाम सिंग यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्याला ४० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. आता मे महिन्यात त्याला पुन्हा ३० दिवसांसाठी जेलबाहेर राहण्याची परवानगी मिळाली आहे.

तुरुंगातील नोंदीनुसार, राम रहीमचा शिक्षेचा कालावधी पाहिला तर त्याने आतापर्यंत एकूण 3193दिवस तुरुंगात पूर्ण केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या एकूण कालावधीपैकी तब्बल 406 दिवस त्याने पॅरोल किंवा फर्लोच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर घालवले आहेत. आतापर्यंत 16 वेळा त्याची अशी तात्पुरती सुटका झाली होती, तर मंगळवारची सुटका ही 16 वी ठरली आहे.