
जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर आंतरराष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (ITA) ने प्रतिबंधित पदार्थ वापरल्यामुळे 21 महिन्यांची बंदी घातली आहे. डोप चाचणीच्या अहवालात दीपाने हिगेनामाइन या प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी ITA ने दीपा कर्माकरला 21 महिन्यांसाठी निलंबित केल्याचे जाहीर केले. तिचे निलंबन 10 जुलै 2023 पर्यंत असणार आहे.
11 ऑक्टोबर 2021 रोजी फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक्स (FIG) ने स्पर्धाबाह्य नियंत्रणाचा भाग म्हणून दीपाचा नमुना गोळा केला होता. त्याची चाचणी केली असता त्यात हायजेनामाइन पॉझिटिव्ह आढळून आले. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने या पदार्थाला प्रतिबंधित यादीत टाकले आहे.
त्रिपुराची दीपा ही हिंदुस्थानातील टॉप जिम्नॅस्ट आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली होती. 2018 मध्ये, तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती हिंदुस्थानातील पहिली जिम्नॅस्ट ठरली.



























































