खिडकी उचकटून कर्वेनगर, हडपसरमध्ये घरफोडी; 13 लाखांचा ऐवज चोरीला

खिडकीचे गज काढून चोरट्यांनी कर्वेनगर आणि हडपसरमधील भेकराईनगरमध्ये घरफोडी करून 13 लाखांचा ऐवज चोरून नेला. लक्ष्मीपूजनासाठी घरात ठेवलेले 1 लाख 57 हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना भेकराईनगरमध्ये घडली. याप्रकरणी नागनाथ सुतार (58) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमेरिकन डॉलरही चोरले

सुतार भेकराईनगरमधील संतकृपा निवास इमारतीत राहायला आहेत. लक्ष्मीपूजनाला त्यांनी देवघरात दागिन्यांची पूजा केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. भाबड तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी खिडकीचे गज उचकटून तब्बल 11 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये 167 ग्रॅम सोन्याचे दागिने, 67 ग्रॅम हिऱ्याचे दागिने, 150 अमेरिकन डॉलरचा समावेश होता. याप्रकरणी अतुल मीनू नारखेडे (वय 49, रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कर्वेनगरमधील अलंकार कॉलनीतील बंगल्यात राहायला आहेत. 19 ते 20 नोव्हेंबरला ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज काढून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील सोन्याचे दागिने आणि अमेरिकन डॉलर असा 11 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला.

गावाहून परत आल्यानंतर अतुल यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या