भिवंडी दुर्घटनेत हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश.

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे हाळी गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळ पर्यंत सहा पैकी चार जणांचे मृतदेह सापडल्याचे कुटूंबीयांनी सांगीतले.

हाळी येथील शेख कुटूंबातील आरीफ युसूफ शेख हा तरूण पोटाची खळगी भरण्यासाठी आठ वर्षांपूर्वी मुंबई येथे पत्नी व तीन मुलांसह गेला होता. तो खाजगी गाडीवर चालक म्हणून कामाला लागला. त्याचा संसार आनंदात सुरू होता. गावी असलेल्या भावालाही त्याने महिनाभरापूर्वी कामासाठी भिवंडीला बोलावून घेतले. तो भिवंडी येथील जिलानी इमारतीत रहायला होता. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास इमारत कोसळली. त्यात इतर कुटूंबासह शेखचे कुटूंब गाडले गेले. त्यात कुटूंबप्रमुख आरीफ युसूफ शेख 32 वर्षे, नसीमा आरीफ शेख 27 वर्षे, निदा आरीफ शेख 10 वर्षे, सादिया आरीफ शेख 7 वर्षे, हसनैन आरीफ शेख 3 वर्षे, सोहेल युसूफ शेख 22 वर्षे यांचा त्यात समावेश आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच हाळी गावावर शोककळा पसरली. कुटूंबातील काही सदस्य तात्काळ भिवंडीकडे रवाना झाले. मंगळवारी पाच वाजेपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडल्याचे कुटूंबीयांनी सांगितले. दरम्यान एकाही मयताला गावी न आणता येत नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आरीफ यांचे वडील युसुफ हे हाळी येथे मजूरी करतात. या दुर्घटनेत दोन्ही कर्त्या मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या