
सामना प्रतिनिधी, मुंबई
मस्जिद बंदर-सॅण्डहर्स्ट रोडदरम्यानचा आणि माझगाव परिसरातील रहिवाशांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱया ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाचे बांधकाम सोमवारपासून सुरू होणार आहे. धोकादायक झाल्याने जानेवारी २०१६ मध्ये हा पूल तोडण्यात आला होता. मात्र तब्बल अडीच वर्षे पुलाचे काम रखडल्यामुळे विभागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या पुलासाठी पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.
हँकॉक ब्रिजच्या रखडलेल्या कामासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रेल्वे अधिकारी, पालिकेचा पूल विभाग, जल विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सर्व विभागांनी पुलाचे बांधकाम सुरू करण्यास कोणताही अडथळा नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारपासूनच कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. या कामासाठी रेल्वे प्रशासनाशी आवश्यक असणारा पाठपुरावा आणि समन्वय साधण्यामध्ये खासदार अरविंद सावंत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन रेल्वेनेच करावे
हँकॉक ब्रिजच्या ठिकाणी असलेल्या झोपड्या पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करून तोडण्यात आल्या असून त्यांना पर्यायी जागाही देण्यात आल्या आहेत. तर रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या रेल्वेनेच हटवून त्यांना पर्यायी जागा द्यावी असे पत्र पालिका आयुक्तांकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.
५१ कोटींचा खर्च, १९ महिन्यांत काम
हँकॉक ब्रिजसाठी ५१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून हे काम १९ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. हँकॉक पुलाची एकूण लांबी -६४.६२ मीटर, रुंदी – ३०.८ मीटर असून स्टील गर्डर व आरसीसी डेक स्लॅबच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
म्हणूनच रखडले काम
या ठिकाणी रुळांच्या खालून मुंबईला पाणीपुरवठा करणारी १२०० मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन गेली आहे. त्यामुळे हे काम सुरू केल्यास जलवाहिनीला धोका पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वेकडून एनओसी देण्यात येत नव्हती. मात्र आता ब्रिजच्या कामासाठी ही पाइपलाइन ९०० मिलीमीटर करण्यात येणार असून डायव्हर्ट करण्यात येणार आहे.





























































