
सामना प्रतिनिधी, मुंबई
भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यानचा आणि माझगाव परिसरातील रहिवाशांना रहदारीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱया हँकॉक ब्रिजचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. या कामात अडथळा ठरणाऱ्या झोपडय़ा हटवण्यास पालिकेच्या ई विभाग कार्यालयाकडून आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हँकॉक ब्रिजचे कामही मार्गी लागणार आहे.
गेल्या वर्षी उद्घाटन झालेल्या हँकॉक ब्रिजच्या कामाला वर्ष उलटले तरी सुरुवात झाली नव्हती. पालिकेच्या ई-विभागाने या ठिकाणच्या 40 झोपडय़ा हटवल्या नसल्यामुळेच हे काम रखडले होते. पालिकेच्या या हलगर्जी कारभाराबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाची स्थायी समितीच्या बैठकीत कानउघाडणी करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी विशेष बैठकही घेण्यात आली.
तब्बल 135 वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनल्याने 9-10 जानेवारी 2016 मध्ये तोडण्यात आला. दरम्यान, या पुलाच्या कंत्राटाबाबत वाद निर्माण झाल्याने प्रकरण न्यायालयातही गेले. न्यायालयीन वाद मिटल्यानंतर गेल्या वर्षी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत नव्या पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले, मात्र वर्षभरानंतरही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नव्हते.




























































