
हार्बर रेल्वे मार्गावर सायंकाळी वांद्रे स्थानकानजीक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास तासभर लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे 14 गाडय़ा रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. अनेकांनी ट्रकमधून पायपीट करून घर गाठले.
रेल्वेच्या हार्बर मार्गावर सायंकाळी 5.47 वाजता माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे घरी निघालेले प्रवासी सुरुवातीला दहा-पंधरा मिनिटे गाडीतच अडकून पडले. मात्र गाडी कधी पुढे जाणार, कशामुळे गाडी थांबली आहे याबाबत कोणतीच उद्घोषणा होत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यामुळे अनेकांना ट्रकमध्ये उतरून चालत वांद्रे स्थानक गाठावे लागले. जवळपास तासाभराने म्हणजे 6.57 वाजता वाहतूक सुरू झाली. हार्बर सेवा ठप्प असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचा आधार घेतला. दरम्यान, वारंवार लोकल सेवेचा खोळंबा होत असल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

























































