वेधक – वाद्यांची श्रीमंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

घरात संगीत क्षेत्राची कोणतीही परंपरा नसताना हरेश केळकरला वाद्यांची आवड निर्माण झाली. रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात विविध वाद्ये सहज उपलब्ध होत नाहीत. हरेशचे वैशिष्टय़ म्हणजे तो साईड ऱिहदम वाजवणारा कलाकार अशी त्याची ओळख. तालवाद्यांसोबत तो ढोलकी, ढोलक, पखवाज ही वाद्येही वाजवतो. त्यामुळे गाण्यातील बारकावे अभ्यासून जसाच तसे संगीत निर्माण करणारी वाद्ये तो शोधून आणू लागला.

संगीत क्षेत्रात अनेक जण पाऊल ठेवतात. विविध वाद्ये वाजवण्यात ते पारंगत होतात. जे वाद्य आपल्याला सहज उपलब्ध होत नाही किंवा त्याची खरेदी करणे खिशाला परवडत नाही म्हणून हरेशने आपली आवड गुंडाळून ठेवली नाही, तर त्याने ती स्वत त्याला मिळतीजुळती अशी तो वाद्ये तयार करू लागला. विविध ठिकाणांवरून शोधून आणलेली वाद्ये आणि हरेशने स्वत तयार केलेली अशी एकूण 50 हून अधिक वाद्ये आहेत. त्याच्या घरात वाद्यांची श्रीमंती आणि कलेची सरस्वती वास करतेय यात काहीच शंका नाही.

हरेशने 2008 साली सर्वप्रथम डफ हे वाद्य घेतले. त्यानंतर त्याने कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्यावर विविध टाळ घेतले. वैशिष्टय़ म्हणजे आज त्याच्याकडे बारा स्वरांचे टाळ आहेत. नऊ प्रकारचे शंख आहेत. त्याच्या संचामध्ये आलेलं नवीन वाद्य म्हणजे हलगी. यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकीत ती हलगी वाजवण्याचा संकल्प त्याने केला आहे.

हरेशने काही वाद्ये स्वत तयार केली आहेत. त्यामध्ये सीड्स शेल्स, ओशियन ड्रम, रेन स्ट्रीट या वाद्यांचा समावेश आहे. जंगलात मिळणाऱया बिया शोधून, त्या कापून त्याने सीड्स शेल्स बनवले आहे.गाण्यात पावसाच्या आवाजाची निर्मिती करणारी रेनस्टीक त्याने स्वतः बनवली आहे.

हरेश केळकर याची साईड ऱिहदम कलाकार म्हणून सर्वत्र ओळख आहे. मुंबईसह अन्य जिह्यांत व काही राज्यांमधील संगीत मैफली त्याच्या साईड ऱिहदमने रंगल्या आहेत. आजच्या या आधुनिक युगात इलेक्ट्रिक माध्यमे उपलब्ध असताना मूळ वाद्यांना सोबत घेऊन तो त्याची वाटचाल करत आहे. शिवराज्याभिषेक या व्यावसायिक कार्यक्रमात ते संगीतसाथ देत आहे.