विरहिणीची आर्तता… हरीचे चिंतन सर्वकाळ।।

3475

प्रकाश खांडगे

विरहिणीतून प्रगटत जाणारी ईश्वरभक्ती… आणि येणारे सोपे.. सुलभ जगणे… माऊलींची निराकार माया…

बीकवींनी संत ज्ञानेश्वरांचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘या बडय़ा बंडवाल्यांत ज्ञानेश्वर माने पहिला.’ भागवत संप्रदायाने कर्मकांड, जप, तप, योग, अधिष्ठान, अनिष्ट रूढी, परंपरा याविरुद्ध बंड केले. भक्तीचा मार्ग सोपा केला. भक्तीचे भांडार सर्वांसाठी खुले केले. भागवत सप्रंदायाचे उत्थान म्हणजेच बंड होते. या बंडाचा पहिला बंडवाला अर्थात ज्ञानेश्वर म्हणूनच भागवत मंदिरासंबंधी अभंगात म्हटले आहे, ‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।।’ ‘आता विश्वात्मके देवे’ असे आर्जव करणाऱया ज्ञानेश्वरांनी धर्माचे नवे मंदिर उभे केले. ‘सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरीच्या नामे।।’ ही संत ज्ञानेश्वरांसह सकल संतांची धारणा होती. ज्ञानेश्वरांनी त्या काळातले ऐहिक वास्तव आणि अध्यात्मिक वास्तव यांचे आकलन वेगळय़ा पद्धतीने केले. धर्मातले जे त्याज्य आहे ते जनसामान्यांपुढे ठेवतानाच जे स्वीकारार्ह आहे त्याचे विवेचन ज्ञानेश्वरांच्या साहित्यात आढळते. गीतेसारख्या हिंदुस्थानी संस्कृतीत वंदनीय असलेल्या ग्रंथाची टीका, समीक्षा ज्ञानेश्वर करतात. गीतेचे ज्ञानेश्वरांनी केलेले अर्थ निर्णयन आजही शीरोधार्य आहे.

अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी सोबतच संत ज्ञानेश्वरांच्या साहित्य संपदेत अभंग, विराण्या, हरिपाठ या रचनांना महत्त्व आहे. पंढरीच्या वारीसाठी निघालेले वारकरी ज्ञानेश्वरांच्या विराण्या, गौळणी बाळक्रीडेचे अभंग, हरिपाठ म्हणत जातात.

आलिये धावती धावती भेट होईल म्हूण

तंव ते टळली वेळ तो माझा उरला शीण।।१।।

आतां काय करूं सांगा वो मज भेटेल कैसा।

हरिलागी प्राण फुटे वो थोरी लागली आज्ञा।२।।

संत तुकारामांच्या या विराणीआधी संत ज्ञानेश्वरांनी विराण्या रचल्या. या विराण्या म्हणजे राधा-कृष्ण गौळणींच्या मनोमीलनाच्या पूर्वीच्या उन्मनी अवस्थेचे नितांत सुंदर प्रतीक!

‘गोकुळीच्या गौळिया। गोपी गोधना सकळा

बापरखुमा देवीवरु विठ्ठले। तें सुख सवंगडिया दिधले

कृष्णाने सर्वांना सुख दिले. जणू काव्याच्या दही-लाहय़ांच्या प्रसादाच्या रूपाने, पण हे सुख देताना सर्वांना निःसंग केले. या निःसंग वृत्तीच्या आधीची वृत्ती अर्थातच अधीर, उन्मनी वृत्ती प्रगट होते विराण्यांमधून म्हणजे विरहपर अभंगातून.

तुजवीण येकली रे कृष्णा न गमे राती।

तंव तुवा नवल केले वेणु घेऊनि हाती।

आलिये तेचि सोय तुझी वोळखिली गती।।1।।

नवल दे वालभ रे कैसे जोडले जीवा।

दुसरे दूरी ठेले प्रीति केला रिघावा।।2।।

भुलविले वेणू नादे। वेणू वाजवी गोविंदे

वेणूचा नाद ऐकण्यासाठी आतुर झालेल्या गौळणींना हरिशिवाय काही सुचत नाही. ‘आत हरी बाहेर हरी’ अशी त्यांची अवस्था झालेली असते, त्याचे दर्शन विराणीमधून होते.

कृष्णे वेधिली विरहिणी बोले।

चंद्रमा करितो उबारा गे माय।

न लवा चंदनु अंगी न घाल विंजणवारा।

हिरविणे शून्य शेजारू गे माय।।१।।

माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा।

माझा बळिया तो पंढरीराणा वो माय।।२।।

नंद नंदनु घडी घडी आणा।

तयावीण न वाचती प्राणा वो माय।

बापरखुमा देवीवरु विठ्ठलु गोविंदु।

अमृतपान गे माय।।३।।

संतांच्या गौळणी हा पुढे तंतांच्या म्हणजे शाहिरांच्या गौळणीचा ऊर्जास्रोत ठरला. या गौळणींमध्ये विराण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विराण्यांची गायकी विशिष्ट चालीतील असते, ज्यातून वारकरी भक्ती तसेच कारुण्य भावाच्या गायकीचे दर्शन घडवितात.

घनु वाजे घुण घुणा। वारा वाजे रुणरुणा।

भवतारकु हा कान्हा। वेगी भेटवा कां।।१।।

चांद हो चांदणे। चापे वो चंदनु।

देवकीनंदनु। विण नावडे वो।।२।।

चंदनाची चोळी। माझे सर्व अंग पोळी।

कान्हो वनमाळी। वेगी भेटवा कां।।३।।

सुमनाची सेज। सितळ वो निकी ।

पोळे आगी सारिखी। वेगी विझवा का।।४।।

तुम्ही गातसा सुस्वरे। ऐको नेदावी उत्तरे।

कोकिळे वर्जावे। तुम्ही बाईयांनो।।५।।

दर्पणी पाहता। रूप न दिसे आपुले।

बापरखुमा देवीवरे विठ्ठले। मज ऐसे केले।६।।

विराण्यांइतकेच वारकरी परंपरेत हरिपाठांना महत्त्व असते. हे हरिपाठ केवळ राम, कृष्ण, विठ्ठल यांचे वर्णन करणारे नसतात तर उपदेशपर देखील असतात.

ज्ञानेश्वर हे कवी होते. सोबतच ते द्रष्टे तत्त्वज्ञ होते. त्याचे ठायी ठायी दर्शन हरिपाठांमधून होते. हरिपाठांचे पारायण अभंग आबालवृद्ध, वारकऱयांच्या मुखी असतात. या हरिपाठांमधून प्रामुख्याने नामसंकीर्तनाचाच महिमा सांगितलेला आहे. कारण नवविधी भक्तीतील संकीर्तन भक्ती ही दुसऱया क्रमांकाची अतिशय महत्त्वाची भक्ती आहे.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।

तेणे मुक्तिचारी साधियेला।।१।।

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।

पुण्याची गणना कोण करी।।२।।

असोनि संसारी जिव्हे वेगु करी।

वेदशास्त्र उभारी बाहय़ा सदा।।३।।

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा।

द्वारकेचा राणा पांडवा घरी।।४।।

केवळ नामसंकीर्तन भक्तीमुळे द्वारकेचा राणा कृष्ण पांडवा घरी होता, असा नामसंकीर्तन भक्तीचा महिमा ज्ञानेश्वर सांगतात.

चहू वेदी जाण साही शास्त्र कारण।

अठाराही पुराणे हरीसी गाती।।१।।

मंथुनि नवनीता तैसे घे अनंता।

वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु।।२।।

या हरिपाठात चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराणे हरीचेच संकीर्तन करतात. नवनीत घुसळावे तशी घुसळन करून अनंत घ्यावा असा संदेश ज्ञानेश्वर महाराज देतात. संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाची रचना सुभाषितांसारखीही काही ठिकाणी दिसते.

योगयाग विधी येणें नव्हे सिद्धी।

भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति।

संतांचे संगती मनोमार्ग गती।

यासारखे हरिपाठाचे अभंग सुभाषितांच्या जातकुळीतील आहेत- नामसंकीर्तन केले तर ‘करतळी आवळे तैसा हरि’ असा विश्वास संत ज्ञानेश्वरांना आहे. त्यामुळे हा विश्वास सर्व सामान्यांच्या अंतःकरणात रुजावा ही त्यांची धारणा आहे. हरिपाठ मुखी असणाऱया भक्तांना कळिकाळाची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे संत ज्ञानेश्वर सांगतात. समाधान रमते ते रम्य होते ते ईश्वरचरणी ही त्यांची धारणा आहे याची प्रचीती परोपरी संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात येते.

ज्ञानदेवी रम्य रमले समाधान।

हरीचे चिंतन सर्वकाळ।।

हरिपाठात ठायी ठायी हरीचे चिंतन आहे, तो जनलोकांचा जणू सामवेद आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या