पाच लाख रुपयांसाठी विवाहितेस घरातून हाकलून दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

शेती घेण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेच्या अंगावरील सर्व दागिने काढून तिला हाकलून देण्यात आले. त्याचप्रमाणे शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याप्रकरणी तिचा नवरा, सासू, दिर व नणंद या चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात रमा नंदेश माटीगिरे यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादीचे लग्न २१ एप्रिल २०१४ रोजी नंदेश भानुदास माटीगिरे याच्यासोबत झाले होते. ५ लाख रुपये, दोन तोळे सोने देऊन २ लाख रुपये लग्नासाठी खर्च करून लग्न संपन्न झाले. मात्र केवळ तीन महिने चांगले नांदवले नंतर गरोदर असताना मला मुलबाळ नको म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केली मात्र आपण गर्भपात करण्यास नकार दिला. मुलगी जन्मली म्हणून पुन्हा त्रास देऊ लागले. शेती घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत म्हणून अंगावरील दागिने काढून घेऊन शिवीगाळ करून मारहाण करून घरातून हाकलून दिले.

सासरी नांदावयाचे असल्याने महिला समुपदेशन केंद्रात तक्रार अर्ज देऊनही सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपये दिल्याशिवाय नांदवणार नाही, असे म्हणून माहेरी येऊन फिर्यादी, फिर्यादीची आई, फिर्यादीचा भाऊ यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नंदेश भानुदास माटीगिरे (नवरा), चंपाबाई माटीगिरे (सासू), जनार्दन माटीगिरे (दिर), सरिता माटीगिरे (नणंद) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.