
>>वैद्य सत्यव्रत नानल
मिरची, ठेचा, तळलेली मीठ लावून ठेवलेली मिरची, सांडग्याची मिरची, ताकातली मिरची, मिरचीपूड, लाल तिखट असे आणि अजून अनेकविध प्रकारे मिरची आपण आहारात भरपूर वापरतो. परदेशी असलेल्या अनेक पदार्थांना हिंदुस्थानात आपलेसे करून टाकले जाते त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मिरची. तिचे अनेक प्रकार आहेत.
मिरची आहारात कशी उपयोगी आणि कशी अपायकारक ठरते ते आज पाहू या.
सर्वप्रथम मिरची वापरण्याचे नियम पाहू –
1) आहारात अन्न ताजेच खावे असे म्हटले तर हिरवी किंवा लाल ताजी मिरची आहारात खाल्ली किंवा वापरली गेली पाहिजे. ताजी नसेल तेव्हाच फक्त लाल तिखट पूड वापरावी हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य.
2) मिरचीच्या बिया कडक असतात. पूर्ण पचत नाहीत. या बिया अख्ख्या खाल्ल्यावर आतडय़ांमध्ये अडकून बसतात आणि तिथेच पडून राहिल्याने आम्लपित्त किंवा पित्ताचे पोटाचे विकार असणाऱयांना तिखटपणामुळे आतडय़ांमधे जखमा (अल्सर) करू शकतात. म्हणून मिरची न चिरता अख्खी जेवणात वापरावी किंवा मिरची चिरून त्यातील बिया काढून फक्त साल वापरावी.
3) थंडीमध्ये स्वस्थ व्यक्तीने मिरचीसुद्धा नियमित खाल्ली तर चालते. उन्हाळ्यात अजिबात वापरू नये आणि पावसाळ्यात मध्यम मात्रेत वापर करावा.
4) मिरचीचे लोणचे थंडीत नियमित खाता येते. त्याने पचन उत्तम राहते. घरी बनवलेले लोणचे अपेक्षित आहे.
5) मिरचीच्या सालीचा ताजा रस काढून तो पदार्थात मिसळला तर थोडय़ाच रसात अन्नाला उत्तम तिखटपणा येतो.
आरोग्यकर फायदे
मिरचीचा रस जेवणात शिजवताना वापरल्याने कफ कमी बनतो आणि तोंडाची चव सुधारून लाळ कमी होते.
मोठय़ा माणसांच्या पोटात जंत असतील तर गुळाचा 5 ग्रॅम खडा घ्यावा. त्यात मिरचीपूड अर्धा चमचा मिसळावी आणि याच्या मटारच्या आकाराच्या गोळ्या कराव्यात. दोन किंवा चार गोळ्या गरजेप्रमाणे रात्री झोपताना गिळाव्यात. गोळ्या चघळून किंवा चावून खाऊ नयेत. त्यानंतर एक तासाने एरंडेल चार चमचे प्यावे. याने एखाद जुलाब होऊन जंत पडतात. आम्लपित्त, आतडय़ातील जखमा (अल्सर) असे पित्ताचे रोग असणाऱयांनी मिरची कधीही वापरू नय़े
पुदिना, कोथिंबीर, शेवगा शेंगेतील बिया, काळी मिरी, अनारदाना, काळे मीठ, मिरची, कढीपत्ता, लसूण, आले हे सर्व प्रकार एकत्र करून छान चटणी बनते. जेवणात तोंडी लावण्यापासून ते पचन सुधारणे, जंत कमी करते. डोळ्यांना हितकर, हाडांचे पोषण सुधारणे, सर्दी-कफ कमी करणे, केसातील कोंडा कमी करणे ही सर्व कामे होतात. थंडीत आवर्जून रोज रात्री जेवणासह चमचाभर खावी.
थंडीत ताजे पातळ ताक बनवताना त्यात कोथिंबीर, मिरची, आले, सैंधव मीठ, काळे मीठ घालून बनवावे आणि दुपारी जेवताना प्यावे. तोंडाची चव सुधारण्यापासून ते अजीर्ण बरे करण्यापर्यंत अनेक कामे हे ताक करते.
मिरची ही तेल आणि तूप, दोन्हीच्या पह्डणीमध्ये वापरली जाते. तुपात हिरवी ताजी चटणी, तेलात सर्व प्रकार वापरले तरी चालतात.
आहारात नियमित थोडी मिरची शरीरातील चरबीसुद्धा कमी ठेवते. रक्तातील अतिरिक्त क्लेद, कफ कमी करते.
शरीराच्या एखाद्या भागावर सुन्नपणा येत असेल तर त्या भागावर मिरची पाण्यात उकळून ते पाणी चोळावे. लगेच फायदा होतो. त्वचेची सहनशक्ती कमी असल्याची सवय असेल तर वापरू नये
सांधेदुखी असेल तर तेलात निगडीबरोबर मिरचीचा काढा घालून उकळावे, आटवून तेल बनवावे आणि हे तेल मालीशसाठी वापरतात. सांध्यांचे दुखणे चांगले कमी होते. सलग सातत्याने तेल मालीश आणि शेक देणे केल्याने टिकाऊ फायदा मिळतो.
शरीरावरील वाईट परिणाम
- मूळव्याध (पाइल्स), परिकर्तिका (फिशर), भगंदर (फिस्टुला) वगैरे असणाऱयांनी मिरची पाहूही नये.
- रक्तातील प्लेटलेट कमी असणाऱयांनी मिरची, काळी मिरी, लसूण, गरम मसाले खाऊ नये.
- आम्लपित्त, अल्सर, नाकातून किंवा शौचावाटे रक्त पडणे, डोकेदुखी, सूर्याचा प्रकाश किंवा ऊन सहन न होणे असे त्रास असलेल्या लोकांनी मिरची वगैरे खाऊ नये.
- लहान मुलांना, नाजूक व्यक्तींना, वयस्कर व्यक्तींना मिरची देऊ नये.































































