
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर आलेल्या एकूण 1962 हरकती, सूचनांवर शनिवारी तब्बल सहा तासांहून अधिक काळ सुनावणी घेण्यात आली. यावेळी अनेक प्रभागांचे सीमांकन, प्रभागातील नागरिकांचे विभाजन या काही महत्त्वाच्या हरकती घेऊन सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनी देखील निवडणूक विभागाच्या निर्दशनास आणून दिल्या.
हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडलेल्या हरकती आणि सूचनांच्या सुनावणीत 47 प्रभाग रचनेबरोबर जनरल सुनावणी घेण्यात आली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी संतोष देहरकर या पाच जणांची समिती याकरिता नेमण्यात आली.
ठामपा प्रभाग रचनेच्या शेवटच्या दिवसापासून 1962 हरकती, सूचना प्राप्त झाल्या होत्या. एकाच दिवशी या हरकती सूचना निकाली लागण्यासाठी वेळ निश्चित करून दिली होती.
































































