
वीकेण्डच्या मुहूर्तावर मुंबईत थंडी शिरली की काय, असा समज करून घेतलेल्या मुंबईकरांना शनिवारी दुपारच्या उकाडय़ाने हैराण केले. शहरात सकाळी तापमानाची पातळी 19.7 अंशांवर खाली आली. त्यामुळे वातावरणात गारवा संचारला. मात्र काही काळातच तो गायब झाला.
दिवसाच्या तापमानाने चालू हंगामातील सर्वात मोठी उसळी घेतली. सांताक्रूझमध्ये पारा 35.4 अंशांवर गेला. हा उकाडा नोव्हेंबर अखेरपर्यंत कायम राहील, तर थंडीसाठी डिसेंबरचीच वाट पाहावी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
यंदा पावसाने दीर्घ काळ मुक्काम ठोकल्याने मुंबई शहर व उपनगरात थंडी उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी सांताक्रूझमध्ये किमान तापमान अचानक 20 अंशांच्या खाली आले. चालू हंगामातील किमान तापमानाची ही निच्चांकी पातळी होती.
याचवेळी कमाल तापमानाने हंगामातील उच्चांकी पातळी गाठली. पाऱयाने शुक्रवारी 35 अंशांवर उसळी घेतली होती. शनिवारी त्यात आणखी वाढ झाल्याने मुंबईकरांना उच्चांकी तापमानाचे चटके सोसावे लागले.
मुंबई शहर व उपनगरांत पुढील दोन-तीन दिवसच तापमान 20 अंशांच्या आसपास राहील. पूर्वेकडून आलेल्या वाऱयांचा हा प्रभाव आहे. पुढील दिवसांत किमान तापमान 22 अंशांच्या आसपास स्थिरावेल, तर कमाल तापमान महिनाखेरपर्यंत 34 ते 35 अंशांच्या आसपास राहील. दिवसाच्या तापमानात घट झाल्यानंतरच थंडी दाखल झाली, असे म्हणता येईल. मुंबईत डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता जाणवेल. – कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते
























































