मुसळधार पावसामुळे गोव्यात जन जीवन विस्कळीत; रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसाने सोमवारी गोव्याला झोडपून काढले. नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला पोहोचण्यात अडचणी आल्या. तसेच कामावर जाणारे चाकारमानीही पावसामुळे खोळंबले होते. पणजीसह बांबोळी, मिरामार परिसरात पाणी भरल्याने गोवा विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, तसेच गोमेकॉमध्ये जाणारे रुग्ण यांना त्रास सहन करावा लागला.

पणजीसह म्हापसा, सत्तरी, पेडणे, मडगाव, फोंडा, काणकोण परिसरातही मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनमोड घाटात दुधसागर मंदिरापासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गोवा-कर्नाटक मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दरड कोसळल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

निगळे पोरासकडे परिसरात मोपा विमानतळावरून पाणी सोडल्यामुळे महादेव मंदिर परिसरात पाणी साचले आहे. मंदिराचा दर्शनी भाग पाण्याखाली गेला असून अनेकांच्या शेती बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे गोवा मेडिकल कॉलेजजवळील सब-वे मध्येही पाणी भरले होते. हे पाणी सब-वे मध्ये वीज पुरवठा करणाऱ्या पॅनेलपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तिथल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह असण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र संभाव्य धोका लक्षात घेत गोवा पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेजजवळील हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे.