उरणची वाहतूककोंडी फुटली: गावकऱ्यांच्या आंदोलन इशाऱ्यानंतर अवजड वाहतूक बंद

55

सामना प्रतिनिधी । उरण

गावकऱ्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खडबडून जाग आलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्काळ आजपासून दिघोडे-दास्तान मार्गावरील बेकायदा अवजड वाहतूक बंद केली. या अंमलबजावणीमुळे या मार्गावरची नेहमी होणारी वाहतूककोंडी फुटली असून रस्त्याची दुरवस्थादेखील थांबणार आहे.

शेकडो रोजगार मात्र बुडणार
दिघोडे-दास्तान मार्गावर दहा कंटेनर यार्ड असून शेकडो कामगार येथे काम करतात, परंतु आता येथील अवजड वाहतूक बंद होणार असल्याने या यार्डना टाळे लागेल, त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडणार आहे.

दिघोडे-दास्तान या मार्गावर वाहतूक पोलिसांनी 2012 पासून अवजड वाहतुकीसाठी बंदी घातली आहे. मात्र असे असतानादेखील गेली कित्येक वर्षे या मार्गावरून अवजड वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्यामुळे वेश्वी, दिघोडे, चिर्ले येथील काही स्थानिकांनी या परिसरात आपले व्यवसाय करण्यासाठी कंटेनर यार्ड आणि गोदामे उभारली. या गोदामांमध्ये येथील शेकडो स्थानिक नोकरी आणि व्यवसाय करत आहेत. पावसाळ्यात कंटेनरच्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर मोठमोठाले खड्डे पडले असून अपघाताची शक्यता आहे. याविरोधात स्थानिक रिक्षाचालक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करतानाच रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

आंदोलनाची दखल घेत पोर्ट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त चव्हाण, उरणचे पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षाचालक-प्रतिनिधी यांची बैठक झाली. यात या मार्गावरील अवजड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तत्काळ आजपासून अंमलबजावणी करण्यात आली. या बैठकीत साईबाबा देवस्थान वहाळचे अध्यक्ष रवी पाटील, पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, पागोटेचे सरपंच भार्गव पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर, अजित म्हात्रे, निग्रेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या