
राज्यातील शासकीय शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता पोषण आहारात पोषक वडी दिली जाणार आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी हे मुख्य घटक असलेल्या पाच प्रकारच्या वड्या दिल्या जाणार असून, शाळास्तरावर या वड्यांच्या वितरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय पोषण आहार कक्षातर्फे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्य़ांना पोषक वड्यांच्या वितरणाबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. पोषक वड्यांची मागणी नोंदवल्यापासून साठ दिवसांत मागणीप्रमाणे पुरवठा करणे बंधनकारक आहे. या कालावधीत पुरवठा करण्यास पुरवठादार अयशस्वी ठरल्यास विलंबाने पुरवठा झालेल्या पोषक वड्यांचे वजन, विलंबाच्या कालावधीची माहिती द्यावी. तसेच, पुरवठा करण्यात आलेल्या पोषक वड्यांचा दर्जा, प्रमाण किंवा वेष्टनाबाबत मुख्याध्यापक समाधानी नसल्यास त्यांनी पोषक वड्या बदलून देण्याबाबत लेखी स्वरूपात पुरवठादारास सूचना करावी. त्यानुसार पुरवठादाराने सात दिवसांत स्वखर्चाने पोषक वड्या बदलून देणे बंधनकारक आहे. पुरवठादाराने पोषक वड्या बदलून न दिल्यास संचालनालयाला कळवावे आणि तेवढय़ा वड्यांची रक्कम कपात करण्याची शिफारस करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून पोषक वड्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पोषक वड्यांच्या पुरवठ्यासाठी कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांना पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या पटसंख्येनुसार पोषक वड्यांची मागणी नोंदवावी लागेल. पाच प्रकारच्या 120 ग्रॅमच्या पोषक वड्या 24 दिवस विद्यार्थ्यांनी आठवड्यातील पाच दिवस दररोज 30 ग्रॅमच्या चार वड्या, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी 45 ग्रॅमच्या सहा वड्या सेवन करणे आवश्यक आहे.

























































