पंढरपुरातील कुंभार घाट पूर्ववत करण्यासाठी काय उपाययोजना करणार? दोन दिवसांत माहिती देण्याचे  हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपुरातील कुंभार घाटातील भिंत कोसळली असून त्या ठिकाणी पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून राज्य सरकारकडून डागडुजीचे काम हाती घेतले आहे. याची दखल घेत 10 जुलै रोजी होणाऱया आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कुंभार घाट पूर्ववत करण्यासाठी काय उपाययोजना करणार ते दोन दिवसांत सांगा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने आज शासनाला दिल्या.

चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मुसळधार पावसात कुंभार घाटावरील भिंत काही भाविकांच्या अंगावर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी, बांधकाम करणाऱया ठेकेदारांच्या कंपनीचा काळ्या यादीत समावेश करण्यात यावा. नव्याने निविदा काढून घाटाचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी करत ऍड. अजिंक्य संगीतराव यांनी ऍड. राकेश भाटकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

सात ठिकाणी संरक्षक भिंत

राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद करताना या परिसरात विक्रदत्त, चंद्रभागा, कासार, महाद्वार, कुंभार व अन्य दोन असे 7  घाट असून या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून संरक्षक भिंत बांधली आहे. त्यापैकी कुंभार घाटात तात्पुरती संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे भिंत अचानक कोसळून अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.