
शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया आरोपीला घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया शिपायाच्या निलंबनावरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
पीडित अल्पवयीन मुलीची बदनामी होऊ नये म्हणून शाळेने चौकशी समितीसमोरील सुनावणीत आरोपीला घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले नाही. शाळेचा हा निर्णय योग्यच होता. दोषी ठरवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही, हा दावा मान्य केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
बोरीवलीच्या शाळेत एका अल्पवयीन मुलीवर तेथील शिपाई नरेश ठाकूरने अत्याचार केला. ठाकूरला अटक झाली व नंतर जामीन मंजूर झाला. शाळेकडून त्याची चौकशी करण्यात आली. यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. ठाकूरने सर्व आरोप फेटाळले. समितीसमोर 14 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. चौकशी समितीने ठाकूरला निलंबित करण्याची शिफारस केली. त्यानुसार ठाकूरला निलंबित करण्यात आले. या निलबंनाला ठाकूरने शिक्षण न्यायाधीकरणासमोर आव्हान दिले. शिक्षण न्यायाधीकरणाने निलंबन रद्द केले. त्याविरोधात शाळेने याचिका केली होती.
आईची साक्ष पुरेशी
पीडिता अल्पवयीन होती. तिने ठाकूरच्या कृत्याचा तपशील आईला सांगितला व आईने साक्ष दिली. ठाकूरचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्या आईची साक्ष पुरेशी आहे. एखाद्याला अशा गंभीर गुह्यात गोवण्यासाठी आई तिच्या 12 वर्षांच्या मुलीचा आधार घेईल, यावर विश्वास ठेवता येणार नाही.अशा प्रकरणात शाळा न्यायाधीकरणाने थोडे संवेदनशील व्हायला हवे. चौकशी समिती शाळेची होती. त्याला काही मर्यादा आहेत. आरोपीचा दोष सिद्ध झाल्यास साक्ष आणि पुराव्यांच्या खोलात जाण्याची शाळा न्यायाधीकरणाला आवश्यकता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
शाळेचा युक्तिवाद
ठाकूरने गंभीर गुन्हा केला आहे. निलंबनाआधी चौकशी समितीसमोर त्याला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. आरोप सिद्ध झाल्यानेच चौकशी समितीने त्याच्या निलंबनाची शिफारस केली. शाळा निलंबनाचा हा निकाल रद्दबातल करावा, असा युक्तिवाद शाळेकडून अॅड. गंगाधर सबनिस यांनी केला.
ठाकूरचा दावा
याप्रकरणातील मुख्य पुरावा सीसीटीव्ही फुटेज होता. जाणीवपूर्वक सीसीटीव्ही फुटेज ठाकूरला देण्यात आले नाही. पीडितेच्या आईचा ठाकूरवर राग होता. राग ठेवूनच ठाकूरला या गुह्यात गोवण्यात आले होते, असा दावा अॅड. जय कानडे यांनी केला.



























































