
कोरोनाला आमंत्रण देणाऱया लोकांच्या गर्दीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली. कोविडची तिसरी लाट तोंडावर असताना लोकांना त्याचे काहीच पडलेले नाही, भीतीही वाटत नाही. आजही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी बेफाम गर्दी करत आहेत. खरे तर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेपासून आपण धडा घेतला पाहिजे व अनावश्यक गर्दी आतापासूनच टाळली पाहिजे, असे मत मुख्य न्यायमूर्तींनी आज व्यक्त केले.
लॉकडाऊनदरम्यान न्यायालयांमधील सुलभता आणि त्यासंबंधित मुद्दय़ांबाबत ज्येष्ठ वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत न्यायालयाने ‘सुमोटो’ याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्यातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱया गर्दीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. जर नियमांचे पालन केले नाही तर आपल्याला गंभीर परिस्थितीचा निश्चितच सामना करावा लागेल. एवढेच काय तर एप्रिल 2022 पर्यंत कोरोना पूर्णपणे हद्दपार होणारा नाही. न्यायमूर्ती म्हणाले, विविध वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत की, मुंबईतील चौपाटय़ा, बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत आहेत. त्यावर सरकार, पालिकेने आताच नियंत्रण मिळवले नाही तर पूर्वीसारखीच गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे अनुभवातून शिकायला हवे.
रुग्ण वाढले, मृत्यूही वाढले! 4196 नवे बाधित रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रुग्णवाढ कायम असून आज रुग्णसंख्या आणि मृत्यूही वाढल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात 4 हजार 196 कोरोनाबाधित आढळले असून 104 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 3 हजार 741 रुग्ण आणि 52 जणांचा मृत्यू झाला होता. काल दिवसभरात 4 हजार 696 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर आज दिवसभरात 4 हजार 688 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
अनधिकृत बांधकामांना 30 सप्टेंबरपर्यंत अभय
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तूर्तास कोणालाही बेघर करणे योग्य नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने विविध महापालिका, नगर परिषद आणि स्वराज्य संस्थांना दिले होते. न्यायालयाने ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.




























































