Hingoli News – कलेक्टर साहेब, आमदार साहेब जागे व्हा… सिरसम गावाला पाणी द्या..; हंडे डोक्यावर घेत महिलांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक येथे जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी डोक्यावर हंडे घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिला व ग्रामस्थांनी ‘कलेक्टर साहेब, आमदार साहेब जागे व्हा..जागे व्हा… सिरसम गावाला पाणी उपलब्ध करून द्या.., अशा घोषणा देण्यात आल्या. सिरसम ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

हिंगोली तालुक्यातील सिरसम बु. येथील ग्रामस्थांना घरोघरी पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळयोजना करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. अवघ्या काही दिवसांवर उन्हाळा आला आहे. परंतु, आतापासूनच सिरसम गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामातून घरोघरी पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी डोक्यावर हंडे घेत मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी महिला व ग्रामस्थांनी ‘कलेक्टर साहेब, आमदार साहेब जागे व्हा.. जागे व्हा…’ सिरसम गावाला पाणी द्या..पाणी…, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सिरसम गावाला तत्काळ पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. सिरसम ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.