
समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल 164 वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये आहेत. या तोफांना एक नवी झळाळी मिळावी, या दृष्टीने या दोन्ही तोफा भव्य पद्धतीने पुन्हा स्थापित करण्याच्या प्रस्तावास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली असून सदर प्रस्ताव पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
त्यामुळे आता लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावर असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच तोफारुपी ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या घाटकोपर पूर्व परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ हे 1971 पासून मुंबईकरांच्या सेवेत असणारे उद्यान आहे. 55 हजार 843 चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाई सोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील दोन तोफा देखील या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही तोफांची लांबी 3.10 मीटर असून तोफांचा आतील घेर हा 0.64 मिटर आणि बाहेरील घेर 1.17 मीटर इतका आहे.
या दोन्ही तोफांवर 1856 अशी नोंद असून एका बाजूला रोमन लिपी मध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे 164 वर्षे जुन्या असणार्या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या भव्य चबुतऱ्यावर पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे नुकताच पाठविला आहे. यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक ठेव्याला नवा रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांना देखील एक ऐतिहासिक स्पर्श असलेले विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.



























































