हॉकी वर्ल्ड कप : हिंदुस्थानची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भुवनेश्वर 

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने शनिवारी कॅनडाचा 5-1 अशा फरकाने धुव्वा उडवत हॉकी वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हिंदुस्थान-कॅनडा यांच्यामध्ये पहिल्या तीन सत्रांत 1-1 अशी बरोबरी झाली होती. मात्र चौथ्या सत्रात हिंदुस्थानच्या हॉकीपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत चार गोल केले आणि क गटातून आगेकूच केली. कॅनडानेही पुढल्या फेरीत आगेकूच केली. मात्र त्यांना क्रॉस ओव्हर लढतीचा सामना करावा लागणार आहे.

हरमनप्रीत सिंगने 12व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर फ्लोरीस सोन याने दमदार गोल करीत कॅनडाला बरोबरी साधून दिली. पहिल्या तीन सत्राअखेर दोन्ही संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी कायम राहिली. चौथ्या सत्रात हिंदुस्थानच्या हॉकीपटूंनी कॅनडाचा बचाव भेदला. चिंगलसेना सिंगने 46व्या मिनिटाला, ललित उपाध्यायने 47व्या व 57व्या मिनिटाला आणि अमित रोहिदासने 51व्या मिनिटाला गोल करीत देशाला दिमाखदार विजय मिळवून दिला. दरम्यान, याच गटातून बेल्जियमने दक्षिण आफ्रिकेला 5-1 अशा फरकाने हरवत आगेकूच केली. त्यांनाही क्रॉस ओव्हर लढतीचा सामना करावा लागणार आहे.