सिंधुदुर्गात शिमग्याची धुम : कुडाळातील शिमगोत्सवाची रंगपंचमीने सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिमगोत्सवाची धुम सुरू आहे. गुरूवारी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. दरम्यान, आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया’ या गाण्यावर थिरकत कुडाळ शहरात तरूणाईने गुरूवारी रंगपंचमीचा आनंद लुटला. कुडाळ शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची मोठ्या थाटात सांगता झाली.

जिल्ह्यात बुधवारपासून शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ठिकठिकाणी होळीचे पुजन करण्यात आले. गुरूवारी शहरांसह ग्रामीण भागात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात डिजेच्या तालावर थिरकत सप्तरंगांची उधळण करीत तरूणाईसह अबालवृध्दांनी रंगपंचमीचा आनंद द्विगुणीत केला. जिल्ह्यात ग्रामीण भागात पाच, सात व पंधरा दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो. या कालावधीत रोंबाड, खेळे, राधानृत्य तसेच विविध प्रकारची सोंगे करून शबय मागण्याची पारंपारिक प्रथा पाहावयास मिळते. ग्रामीण भागात सध्या शिमगोत्सवाची धुम सूरू आहे.