स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चार घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यातील चोरट्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, हरून लोहार, प्रदीप चोपणे, नागनाथ जांभळे यांचा समावेश होता. घरफोडी उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने तपास पथक वेगवेगळ्या मार्गाने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत होते.
दि. 27 मे रोजी पथकाने कृष्णा श्रावण शिंदे (21, रा. सुंबा, जिल्हा धाराशिव) याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करून तपास करण्यात आला. घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल करून त्याने घरफोडीत चोरी केलेला मुद्देमाल, एक मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि 6 मोबाईल असा एकूण 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्याने त्याच्या इतर साथीदारांसह पोलीस स्टेशन मुरुड, किल्लारी, भादा आणि एमआयडीसी या हद्दीमध्ये केलेले चार गुन्हे मान्य केले आहेत.



























































