दीड महिना झाला, सीबीआय करतेय काय? गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड महिन्यापासून सीबीआय अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास करत आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचे उत्तर सीबीआय कधी देणार? लोकांना सत्य समजले पाहिजे, अशा तिखट शब्दांत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुशांत प्रकरणावरून सीबीआयवर निशाणा साधला. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत असतानाच अचानक हा तपास काढून सीबीआयकडे देण्यात आला. दीड महिन्यापासून सीबीआय या प्रकरणात अहोरात्र काम करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य लवकरात लवकर बाहेर आले पाहिजे, असा टोला अनिल देशमुख यांनी मारला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत नसल्याचा आरोप करून बिहार सरकारने चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी थेट सर्वेच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. सीबीआयकडे तपास देऊन दीड महिना लोटला आहे. ड्रग्ज कनेक्शनपलिकडे या प्रकरणात सीबीआयच्या हाती काही लागले नाही. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौड यांनी या प्रकरणाचा तपास अतिशय ‘प्रोफेशनल’ पद्धतीने करण्यात येत असल्याचे सांगितले होते.