नोकरदार महिलांसाठी मुंबईत गोरेगावात अद्ययावत वसतिगृह सुरू; 16 मजली इमारत, 180 महिलांच्या निवाऱ्याची व्यवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोरंजन, विरंगुळा केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंपाकघर आणि सुरक्षित निवारा अशा सुविधा असलेले अद्ययावत वसतिगृह पालिकेने महिलांसाठी गोरेगाव पश्चिम येथे सुरू केले आहे. 16 मजली 180 महिलांच्या निवाऱ्याची व्यवस्था असलेल्या या वसतिगृहामुळे गरजू महिलांची मोठी सोय होणार आहे.

नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्या अनेक महिला-मुली कमी घरभाडे आणि सुरक्षित घराच्या शोधात असतात. पण सुरक्षेच्या हमीसाठी काहींना दामदुप्पट घरभाडे मोजावे लागते. तर काही वेळा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशा महिलांसाठी बहुउद्देशीय गृहनिर्माण इमारत बांधण्याचे आरक्षण विकास नियोजन आराखडा 2034 मध्ये ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हे वसतिगृह बांधण्यात आले आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत या वसतिगृहाचे लोकार्पण आज करण्यात आले. मुंबईत नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी येत्या वर्षभरात आणखी पाच ठिकाणी वसतिगृहाची सुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे लोढा यांनी यावेळी सांगितले.

असे आहे वसतिगृह

ही इमारत बहुउद्देशी असणार आहे. या वसतिगृहात 74 खोल्यांमध्ये एकूण 180 खाटांची सोय करण्यात येणार आहे.

गोरेगाव पश्चिम पहाडी गाव येथील  5882.68 चौ.मी. जागेत वसतिगृहाचे बांधकाम होणार.

चौथा ते सहावा, आठवा ते 13 आणि 15 व 16 या मजल्यांवर प्रत्येकी आठ खोल्या व 15 खाटांसह.

तर सातव्या आणि 14 व्या मजल्यावर प्रत्येकी चार खोल्या आठ खाटांसह असतील.